आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:ड्रायव्हिंगचा ताण, वाहतूक कोंडी, प्रदूषण टाळण्यासाठी 72% नोकरदारांची ‘वर्क फ्राॅम होम’ला पसंती

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात संगणकाधारित उद्योगांच्या शहरांमध्ये सर्वेक्षण

कोरोना संसर्गामुळे देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आधुनिक जीवनशैलीतील अनेक घटकांचा नव्या दृष्टीने विचार होऊ लागल्याचे चित्र समोर येत आहे. संगणकाधारित काम करणाऱ्या नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती दररोज कार्यालयात हजेरी लावण्याच्या तुलनेत अधिक सकारात्मक आणि कार्यक्षम करणारी वाटत आहे. दिल्ली येथील ‘क्लायमेट ट्रेंड्स’ या स्वयंसेवी संस्थेने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील अंतिम चरणात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे चित्र पुढे आले आहे.

सर्वेक्षणात सॅम्पलिंगची संख्या मर्यादित असली तरी देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या आणि संगणकाधारित उद्योगांमध्ये स्थिरावलेल्या शहरांतील नोकरदारांकडून हे सर्वेक्षण केले गेले आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद, जयपूर आणि सुरत या दहा शहरांतील निवडक १०८२ नोकरदारांकडून माहिती घेण्यात आली. हे सर्वेक्षण अर्थातच ऑनलाइन स्वरूपाचे होते. त्या माहितीच्या विश्लेषणावरून निघालेला प्रमुख निष्कर्ष हाच आहे की, ७२ टक्क्यांपेक्षा अधिक नोकरदारांनी ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पना उचलून धरली आहे. लॉकडाऊन संपल्यावरही घरून काम करायला आवडेल, असे या नोकरदारांनी म्हटले आहे.

ही आहेत कारणे

कामाची जागा आणि निवासस्थान यातील अंतर, स्वत:चे वाहन असल्यास ड्रायव्हिंगचा ताण, प्रचंड वाहतूक कोंडीचा ताण, प्रदूषण (ध्वनी आणि हवा) हे सहन करताना वाया जाणारी ऊर्जा आणि वेळ, हे मुद्दे प्रामुख्याने दिसतात. गेल्या दोन महिन्यांच्या काळात घरूनच काम केल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि कामात झालेली गुणात्मक वाढ उल्लेखनीय आहे, हे वरिष्ठांचेही मत असल्याचे सर्वेक्षणात समोर आले.

वर्क कल्चरचा नव्याने विचार करण्याची गरज

सर्वेक्षणात प्रातिनिधिक स्वरूपात जे निष्कर्ष पुढे आले आहेत, ते पाहता एकूणच पुढील काळात वर्क कल्चर या मुद्द्याचा नव्याने विचार करणे गरजेचे ठरणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. नोकरदारांनी मांडलेले प्रदूषण, ऊर्जा वापर, गुणवत्तेचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. - आरती खोसला, संचालक, क्लायमेट ट्रेंड्स

वाहन व्यवस्थेचा कंपनीचा खर्च वाचला

शहरी नोकरदारांनी मांडलेला दुसरा मुद्दाही विचारात घेण्यासारखा आहे. तो म्हणजे, रोज कार्यालयात पोचण्यासाठी अनेक कंपन्यांना वाहन व्यवस्था करावी लागते. त्या व्यवस्थेत मोठी गुंतवणूक करावी लागते. गेले दोन महिने कंपन्यांचा हा खर्च वाचला आहे. यापुढेही वर्क फ्रॉम होमला परवानगी मिळाल्यास कंपन्यांचा हा मोठा खर्च वाचेल, असे मत नोंदवण्यात आले आहे. काही नोकरदारांनी यापुढे सार्वजनिक वाहन व्यवस्था तसेच शक्य तिथपर्यंत पायी प्रवास करण्याचे ठरवले असल्याचा उल्लेख केला आहे. कंपन्यांनी बिझनेस ट्रॅव्हलवर मर्यादा आणाव्यात, असेही सुचवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...