आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेत प्रवेश:उद्धव यांना पाठिंबा देण्यासाठी 76 हजारांच्या पगारी नोकरीचा राजीनामा, शिक्षकाचा शिवसेनेत प्रवेश

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या राज्याच्या राजकारणात दररोज नवीन घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्याने शिवसेनेला खिंडार पडले आहे. त्यातच अनेक जण आता शिवसेनेत प्रवेश करत आहेत. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शिक्षकाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी चक्क 76 हजार रुपये पगाराच्या नोकरीचा राजीनामा देत शिवसेनेसाठी पूर्णवेळ काम करण्याचा निश्चय केला आहे.

दीपक पोपट खरात असे राजीनामा देणाऱ्या शिक्षकाचे नाव असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवून “शिवसेना’ या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे खरात यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. दि. 27 जुलै रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचालित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात 1 फेब्रुवारी 2002 पासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या वालचंदनगर येथील पाठशाळा क्र. 3 येथे उपशिक्षक पदावर ते कार्यरत आहेत. त्यांची आतापर्यंतची सेवा 20 वर्षे 6 महिने इतकी झाली आहे. उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी राजीनामा देणारे ते बहुतेक राज्यातील पहिलेच शिक्षक असावेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.

पेन्शनवर घर चालेल
खरात म्हणाले, मी शिवसेनेत प्रवेश केला नव्हता. परंतु मी शिवसेना समर्थक म्हणून सन 2005 पासून कार्यरत आहे. मला शिक्षक म्हणून 76 हजार रुपये पगार होता. राजीनामा दिल्यावर 25 हजार पेन्शन मिळेल, त्यावर कुटुंबाची गुजराण होऊ शकते. माझी आणखी 17 वर्षे सेवा बाकी होती. सध्या शिवसेनेतून अनेक जण बाहेर गेल्याने मी पक्षासाठी पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कुटुंबीयांनाही मी माझा निर्णय सांगितला आहे. उद्या मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेटण्यास बोलावले असून मी शिवसेनेत प्रवेश करून पूर्णवेळ पक्षाचे काम करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...