आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात सन २०२२-२३ या वर्षात तुती लागवडीसाठी देण्यात आलेल्या २५० एकर लक्ष्यांकापैकी २४१ एकर क्षेत्रावर २२६ शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली असून चालू वर्षात ३ लाख ९ हजार ४०० अंडीपुंजाच्या कीटक संगोपनापासून २ लाख १८ हजार ४१४ किलोग्रॅम कोषांचे विक्रमी असे उत्पादन घेतले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत अंडीपुंज संख्या ३३ हजार ८२५ संख्येने जास्त असून कोष उत्पादन ४० हजार ५९९ किलोग्रॅमने वाढल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांनी मंगळवारी दिली. पुणे जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अंडीपुंजाच्या अनुदानापोटी १३ लाख ३३ हजार ९१३ रुपये मंजूर झाले. लाभार्थींना ती रक्कम वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात १७५ अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. ही योजना ३ वर्षाच्या कालावधीसाठी असून विभागून एकरी रुपये ३ लाख ४२ हजार ९०० रूपये अनुदान देण्यात येते. जिल्हा वार्षिक योजनेतून नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती येथे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने रॉ सिल्क सेंटरसाठी ५ लाख ३९ हजार रुपयांचा निधी मिळाला. त्यातून यंत्र उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. खेड तालुक्यातील मौजे दौंदे येथे खासगी स्तरावर बालकीटक संगोपन केंद्र असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना २ अवस्था पूर्ण झालेल्या रेशीम कीटकांचा (अळ्यांचा) पुरवठा केला जातो.
तुतीपासून ‘ग्रीन टी’ द्वारे उत्पन्न रेशीम शेती उद्योगामध्ये कोषापासून वस्त्रनिर्मितीपर्यंत आर्थिक लाभ मिळतोच, परंतु याशिवाय तुती पाल्यापासून “ग्रीन टी’ तयार केली जाते. तुतीची ग्रीन टी मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात गुणकारी ठरते. प्युपापासून (सुरवंटापासून) मत्स्यखाद्य व तेल निर्मिती होते. तसेच तुतीच्या फळांपासून उच्च दर्जाची वाइन निर्मिती केली जाते. याशिवाय अलीकडच्या काळात रेशीममध्ये असणाऱ्या सेरिसिन या रसायनापासून विविध औषधे बनवली जातात. नुकत्याच झालेल्या संशोधनातून यापासून बनवलेले औषध कर्करोगावर परिणामकारक असल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रेशीम उद्योगात चीन मागे पडला असून भारताला मोठी संधी निर्माण झाली आहे.
राज्यात व देशात प्रथमच बारामतीत इनाम पद्धतीने खरेदी महाराष्ट्रात पहिल्यांदाच कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व रेशीम संचालनालय यांच्या समन्वयाने इनाम पद्धतीने कोषांची खरेदी करण्यास सुरुवात झाली. या बाजारात ५१ हजार ६२६ किलोग्रॅम कोषांची खरेदी झाली आहे. त्याची किंमत २ कोटी ९६ लाख ९६ हजार ४९० रुपये आहे. भारतात ई-नाम पद्धतीने कोषांची खरेदी करणारा पुणे हा पहिलाच जिल्हा आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समोर कोष परीक्षण अहवाल तयार करून त्याच्या साहाय्याने ऑनलाइन लिलाव प्रक्रिया अवलंबली जाते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.