आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनास्था:पुण्यातील 90 टक्के वारांगना कर्जबाजारी; शासनाची मदत गैरव्यवहारात अडकली, 10 ते 12 टक्के व्याजाने घेतले जातेय कर्ज

पुणे18 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक

पावडर, लिपस्टिक लावून नटूनथटून इतरांपेक्षा आपण वेगळ्या कशा दिसू आणि ग्राहकांना आकर्षित करू या विचाराने पुण्यातील बुधवार पेठेतील गल्लीत उभ्या असणाऱ्या वारांगनांची भुरळ अनेकांना पडताना दिसते. मात्र, काेराेनामुळे लाॅकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आणि वारांगनांचे अर्थचक्र थांबले. परिणामी अशा ९० टक्के महिला कर्जबाजारी झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शासनाच्या मदतीतही गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्याने मदत थांबली आहे. अशा स्थितीत या महिलांची आर्थिक कुचंबणा होत असून कुटुंबीयांच्या आरोग्याचीही हेळसांड होत आहे.

कर्नाटक, आंध्र प्रदेश, आेरिसा, पश्चिम बंगाल, ईशान्य भारत, नेपाळ, पश्चिम बंगाल अशा विविध भागांसह महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या वारांगना पुण्याच्या बुधवार पेठेत येत असतात. साधारण तीन हजार अशा महिला या ठिकाणी वास्तव्यास आहेत. याशिवाय पुण्याच्या उपनगरात भाड्याने खाेली घेऊन कुटुंबासमवेत राहून येथे व्यवसाय करण्यास येणाऱ्या महिलांचे प्रमाण वेगळे आहे. काेराेनाचे संकटाने सुरुवातीला रस्त्यावर पत्रे लावून बंदिस्त करण्यात आलेल्या पेठेतील वारांगनांचे दैनंदिन अर्थचक्र रुतले आहे. बँकेतील शिल्लक, साेन्याचे दागिने विकूनही ससेहोलपट थांबत नसल्याने या महिलांनी १० ते १२ टक्के चक्रवाढ व्याजाने हप्तेवाल्यांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे जिकिरीचे झाले आहे. घरभाडे, वीज बिल, माेबाइल रिचार्ज, मुलांचे पालनपाेषण, गॅस बिल, दवाखाना, आैषधे, वाहनाने ये-जा, गावास बांधलेल्या घराचे हप्ते आदी गाेष्टींकरिता हातात पैसाच नसल्याने या महिलांना पैशांची गरज आहे. परंतु बँका कर्ज देईनात आणि हप्तेवाल्यांचे चक्रवाढ व्याजदराचे कर्ज फिटेना अशा बिकट अवस्थेत महिला सापडल्याने उधारीवरही त्यांना काेणी मदतीस पुढे येईनासे झाले आहे.

घराचे हप्ते भरण्यात अडचणी
प. बंगालची ३२ वर्षीय सुमन (नाव बदलले आहे) म्हणाली, बुधवारपेठेत ५-६ वर्षांपासून मी व्यवसाय करत आहे. लाॅकडाऊनपूर्वी गावी कर्ज घेऊन घर बांधल्याने त्याचे हप्ते सुरू आहेत. काेराेनात पुण्यातील घरभाडे, वीज बिल भरणेही अवघड झाल्याने मागील लाॅकडाऊनमध्ये साेन्याची अंगठी, चेन गहाण ठेवून ५० हजारांचे कर्ज घेतले. मात्र, हे पैसेही संपले आहेत.

मुलांचे शाळा साेडण्याचे प्रमाण वाढले : तेजस्वी सेवेकरी
वारांगनांकरिता ‘सहेली’ स्वयंसेवी संस्थेमार्फत काम करणाऱ्या तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, येथील अनेक महिलांना स्मार्टफाेन घेण्याकरिता किंवा माेबाइल रिर्चाजसाठीही पैसे नसल्याने मुलांचे आॅनलाइन शिक्षण बंद झाले. सुमारे २०० मुले त्यांच्या आईसाेबत राहत असून पाळणाघर, हाेस्टेल मागील वर्षीपासून बंद झाल्याने या मुलांचे शाळा साेडण्याचे प्रमाण वाढले आहे. ४० टक्के महिलांनी हप्तेवाल्यांकडून तर ५० टक्के महिलांनी आेळखीच्या लाेकांकडून पाच हजार ते दीड ते दाेन लाखांपर्यंत कर्ज घेतल्याचे संस्थेच्या सर्वेक्षणातून दिसले.

सरकारी मदतीत घाेटाळा
राज्य सरकारमार्फत वारांगनांना दरमहा पाच हजार अशी आॅक्टाेबर ते डिसेंबर २०२० या तीन महिन्यांची १५ हजार रक्कम बँक खात्यात टाकण्यात आली. जिल्ह्यात अशा पाच हजार २९६ महिलांच्या खात्यात सात काेटींची मदत जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, याएेवजी कचरावेचक, भंगार गाेळा करणाऱ्यांच्या महिलांच्या नावावर जमा झाल्याचे उघडकीस आले.

बातम्या आणखी आहेत...