आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाचा उमेदवार न दिल्याने ब्राह्मण समाज भाजपवर नाराज झाला आहे. या नाराजीचा भविष्यात महाराष्ट्रातील ४० जागांवर परिणाम होऊ शकतो. या जागांवर ब्राह्मण समाज निर्णायक भूमिका बजावत आल्याचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले.
कुलकर्णी म्हणाले, राजकीय दृष्टिकोनातून पुणे ब्राह्मणमुक्त करण्यात येत आहे. भविष्यात ब्राह्मण समाजाला येथून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल याचीही शाश्वती नाही. भाजपने नेहमीच ब्राह्मण समाजाला महत्त्व दिले आहे. मग या वेळी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून ब्राह्मण समाजाला उमेदवारी का दिली नाही? याबाबत मी ठोसपणे काही बोलण्याच्या स्थितीत नाही. कारण भाजपची भूमिका काय आहे, आम्हाला (ब्राह्मण समाजाला) याची माहिती नाही. देशात पूर्वी किमान ६ ते १० मुख्यमंत्री ब्राह्मण असायचे. आज फक्त दोनच ब्राह्मण मुख्यमंत्री आहेत. एक ममता बॅनर्जी आणि दुसरे हेमंत बिस्वा शर्मा हे समाजाचे मुख्यमंत्री आहेत. भाजपने संपूर्ण देशात ब्राह्मण समाजाचा एकच मुख्यमंत्री ठेवला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि यूपीमध्ये बृजेश पाठक हे दोनच उपमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत.. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांना सोडले तर ब्राह्मण समाजातील दुसरा मंत्री आहे का, असा सवालही कुलकर्णी यांनी केला आहे.
१२ सक्षम ब्राह्मण उमेदवारांची यादी देतो : कुलकर्णी म्हणाले, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात गेली ४० वर्षे ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व होते. ‘ब्राह्मणांच्या नाराजीचा काय उपयोग? आमच्या नाराजीची कोणीही दखल घेत नाही. पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या किमान दोन-तीन जागा आणि लोकसभेची एक जागा ब्राह्मण समाजाला द्यावी. ब्राह्मण समाजाचे लोक उस्मानाबाद आणि चंद्रपूरला जाऊन प्रतिनिधित्व मागू शकत नाहीत. त्यामुळे पुण्याच्या उरलेल्या एका जागेवरही ब्राह्मण समाजाला उमेदवारी का दिली गेली नाही? पुण्यात एकही सक्षम ब्राह्मण उमेदवार नाही असे भाजपचे म्हणणे असेल तर मी कसबा पेठ परिसरातच १२ सक्षम ब्राह्मण समाजाच्या संभाव्य उमेदवारांची नावे सांगू शकतो, असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.