आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक कोटींचे अंमली पदार्थ जप्त:पुण्यात प्रसिद्ध महाविद्यालयाजवळ सराईत गुन्हेगार करत होता विक्री; गुन्हा दाखल

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील विमान नगरमधील सिम्बायोसिस या नामांकित महाविद्यालयाजवळ एका सराईत गुन्हेगारावर कारवाई करून पोलिसांनी तब्बल एक कोटी सात लाख दहा हजार रुपयांचा एमडी हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. अरविंद रविंद्र बिर्हाडे (वय 36) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला.

खूनाचा अन् बलात्काराचा गुन्हा दाखल

आरोपी अरविंद बिऱ्हाडे हा जळगावमधील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खूनाचा प्रयत्न, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, विमानतळ पोलिस ठाण्यातील अंमलदार सचिन जाधव यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम सिम्बायोसिस महाविद्यालयाजवळ संशयितरित्या उभा असून, त्याच्याकडे अमली पदार्थ आहे. त्यानूसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याला सापळा रचून पकडले. त्याच्याकडे चौकशी करत झडती घेतल्यानंतर 1 कोटी 7 लाख रुपयांचा एम.डी. हा अमली पदार्थ मिळून आला.

पोलिस पथकाची कामगिरी

आरोपीला अटक करून त्याची कसून चौकशी केली जात आहे. हा अंमली पदार्थ कोठून आणला व कोणाला विकणार होता याची माहिती पोलिस घेत आहे. पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक रविंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे, अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, प्रदीप मोटे, रुपेश मिसाळ, गिरीश नाणेकर, अंकुश जोगदंडे, संजय असवले यांच्या पथकाने केली आहे.

आठ गुन्हे दाखल

विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरविंद बिऱ्हाडे हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर आठ गुन्हे दाखल आहे. यामध्ये बलात्कार, खंडणी, खूनाचा प्रयत्न, दंगल, मारहाण, अपहरण अशा विविध गंभीर गुन्हयांचा समावेश आहे.

पोलिस चौकी जाळण्याचा प्रयत्न

2016 मध्ये जळगाव जिल्हयातील अंमळनेर येथे एका गुन्हयात पोलिसांनी त्यास अटक केल्यानंतर त्याने पोलिस चौकी जाळण्याचा प्रयत्न केला होता व यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. अंमळनेर येथील एका माजी नगरसेवकावर खुनी हल्ला करुन तो मागील आठ महिन्यापासून फरार झालेला होता. पुण्यात एमडी हा अंमली पदार्थ कोणाला तरी देण्याकरता तो आला होता. याबाबत पोलिस तपास करत आहे. एका पंजाबी ट्रक चालकाने त्यास सदर अंमली पदार्थ दिल्याची माहिती दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...