आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानी-भारतीय कलेचा सांस्कृतिक मेळा:जपानी कलाकारांचे ‘कोन्निचिवा’त सादरीकरण पाहण्याची संधी

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानी व भारतीय कलेचा सांस्कृतिक मेळा अनुभवण्याची संधी पुणेकरांना १९ व २० नोव्हेंबर रोजी उपलब्ध होणार आहे. निमित्त आहे विमाननगर येथील फिनिक्स मार्केटसिटी येथे इंडो-जपान बिझनेस काउंसिल अर्थात आयजेबीसी आणि जपान सरकारचे कॉन्स्यूलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कोन्निचिवा पुणे २०२२’ या दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे. सदर महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून जपानी व भारतीय कलांचा अनोखा आविष्कार येथे अनुभवता येईल. जपानी कलाकारांचे सादरीकरण हे या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य असेल, अशी माहिती आयजेबीसीचे अध्यक्ष सिद्धार्थ देशमुख यांनी दिली. भारत-जपान सबंध हे सौदार्ह्यपूर्ण आहेतच, मात्र तरीही दोन्ही संस्कृतींमध्ये आदानप्रदान व्हावे आणि पर्यायाने व्यापार, व्यवसाय, शिक्षण यांच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ‘कोन्निचिवा पुणे २०२२’ या महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाच्यानिमित्ताने अकिको कातो या जपानी योग तज्ज्ञ उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. ख्यातनाम संतूरवादक शिवकुमार शर्मा यांचे शिष्य ताकाहिरो अराई यांचे सादरीकरण हे देखील महोत्सवाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. यानंतर संगीतकार आणि जपानी तबलावादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या नोरीको शक्ती यांचा कार्यक्रम होईल. असानो फुकूई या कलाकारांचा जपानी सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रम असेल. याबरोबरच जपानी गायिका, कवयित्री आणि नृत्यांगना असलेल्या हिरोको सारा या पहिल्या दिवसाचे आकर्षण असतील. सारा यांच्या गुरु या प्रसिद्ध कथक नृत्यांगना गुरु सितारादेवी यांच्या कन्या आहेत. महोत्सवादरम्यान टीम मिस्टिक जॉनेत्सु या अंतर्गत कुश्मीर, अबेक्स आणि हिरोको सारा हे एक जपानी-भारतीय फ्युजन सादरीकरण करणार आहेत. याबरोबरच महोत्सवात ओरिगामी, जपानी पारंपरीक पोषाख, फुलांची जपानी पद्धतीने सजावट करण्याची कला असलेली इकेबाना, जपानी कपडे परिधान करण्याची किमोनो पद्धती, बॉन ओडोरी पहायला मिळेल.

जपानी टी सेरेमनीची मिळणार माहिती ‘शोडो’ या सुप्रसिद्ध जपानी सुलेखन पद्धतीच्या तज्ज्ञ असलेल्या कजुको बरिसिक यांचे व्याख्यान व प्रात्यक्षिक महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असेल. जगप्रसिद्ध जपानी टी सेरेमनी विषयी कजुको बरिसिक या विषयी देखील अधिक माहिती देतील. यानंतर फुमी नेगिशी यांचा भारतीय संगीतावर आधारिक कार्यक्रम होईल. तसेच खाद्यमहोत्सव, आर्ट कॉर्नर हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असेल.

बातम्या आणखी आहेत...