आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजामध्ये मूर्तिशास्त्राबद्दल प्रचंड अनास्था:जगामध्ये 33 कोटी देव नाहीत तर 33 प्रकारचे आहेत देव, मूर्ती शास्त्रज्ञ डॉ. देगलूरकर यांचे मत

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या मनातील कार्य सिद्धीस जाण्यासाठी माणूस विविध प्रकारच्या मूर्तींची पूजा करतो, परंतु अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष ज्या मूर्तीची पूजा करतात त्या मूर्ती कोणत्या देवाच्या आहेत, त्याचे स्वरूप काय आहे, याबद्दल सुद्धा माहिती नसते. समाजामध्ये मूर्ती शास्त्राबद्दल प्रचंड अनास्था आहे. आपण ज्या गुणप्राप्तीसाठी देवाची पूजा करतो, त्या देवाच्या मूर्तीची तरी माहिती आपण घेणे आवश्यक आहे असे मत ज्येष्ठ मूर्ती शास्त्रज्ञ डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.

सद्गुरू श्री जंगली महाराज यांच्या १३३ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जंगली महाराज मंदिर उत्सवामध्ये “सगुणाचे द्वारे निर्गुण पाविजे’ या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. डॉ.गो.बं. देगलूरकर म्हणाले, जगात ३३ कोटी देव नाहीत तर ३३ प्रकारचे देव आहेत. प्रत्येक मनुष्य आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि त्या प्रकारचे गुण प्राप्त करण्यासाठी मूर्तीला घडवत असतो आणि त्या मूर्तीची पूजा करतो. पूर्वी निर्गुण निराकार असणाऱ्या पंचमहाभूतांची पूजा केली जात असे, त्यानंतर त्या निर्गुण निराकाराचे रूपांतर सगुण रूपामध्ये झाले आणि विविध प्रकारच्या देवांच्या मूर्ती घडल्या.

मूर्ती पूजा करण्यामागे तत्त्वज्ञान आहे. मूर्तिपूजा करणे म्हणजे बुरसटलेले विचार आहेत, असे मानणे चुकीचे आहे. सनातन नित्यनूतन या विचारांप्रमाणे समाजामध्ये नित्य नवीन बदल होत राहतात आणि त्याचेच प्रतिबिंब मूर्तीमध्ये आणि माणसाच्या विचारांमध्ये पडते. त्यातूनच माणूस मूर्ती पूजेकडे वळला, असेही देगलूरकर यांनी या वेळी सांगितले.