आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सेवा मित्र मंडळ ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम:दिव्यांग सैनिकांसमवेत सद्भावना रॅली काढून गणेशोत्सवात एकतेचा संदेश; सैनिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि खडक पोलिस स्टेशनतर्फे शहराच्या पूर्वभागामध्ये हिंदू-मुस्लिम गणेशभक्तांनी एकत्र येत दिव्यांग सैनिकांसमवेत सद्भावना रॅली काढून गणेशोत्सवात एकतेचा संदेश दिला. यावेळी कर्नल वसंत बल्लेवार, क्विन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट, खडकी चे डॉ. कॅप्टन चंद्रशेखर चितळे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

सैनिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

भारत माता की जय...वंदे मातरम चा घोषणेने दुमदुमून गेलेला परिसर... सैनिक आणि पोलिसांवरती केलेली फुलांची उधळण... अभिमानाने प्रत्येकाने हाती धरलेला भारताचा तिरंगा... अशा देशभक्तीने भारलेल्या वातावरणात हिंदू आणि मुस्लिम गणेश भक्तांनी दिव्यांग सैनिक आणि पोलिसांसोबत देशभक्ती व हिंदू मुस्लिम एकतेचा नारा दिला. शहराच्या पूर्व भागातील चौका-चौकात महिलांनी केलेले औक्षण, फुलांची झालेली उधळण आणि भारत मातेचा जयघोष ऐकून सैनिकांच्या डोळ्यात रविवारी आनंदाश्रू तरळले.

सद्भावना रॅलीचे यंदा 10 वे वर्ष

सद्भावना रॅलीचे यंदा 10 वे वर्ष आहे. शहराच्या पूर्व भागातील गंज पेठेतील जिव्हेश्वर मंगल कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ च्या चौकात समारोप झाला. जय हिंद म्युझिकल बँड मिरवणुकीत सहभागी झाला होता. पूर्वभागातील गणेश मंडळांसह मुस्लिम मुली, भगिनी व बांधवांनी देखील सैनिकांचे स्वागत केले.

शौर्याला अभिवादन करून सन्मान

राजेंद्र डहाळे म्हणाले, सैनिकांनी सीमेवर दाखवलेल्या शौर्यामुळेच आपण देशात सुरक्षित राहू शकतो. ज्या देशाची सुरक्षा उत्कृष्ट आहे त्या देशाची भरभराट होते. आपल्या देशाची तिन्ही दले मजबूत आहे. त्यांच्या शौर्याला अभिवादन करून त्यांचा सन्मान केला पाहिजे.

कर्नल वसंत बल्लेवार म्हणाले, पूर्ण जगात भारतीय सेना अव्वल आहे. सैन्यात असताना सैनिक देशाची सेवा करतोच परंतु निवृत्त झाल्यानंतर देखील तो देशाची सेवा करत असतो, असेही त्यांनी सांगितले. कॅप्टन चंद्रशेखर चितळे म्हणाले, दिव्यांग सैनिकांसमोर आपण निवृत्तीनंतर काय करायचे, हा प्रश्न असतो. त्यांना आयुष्यात त्यांच्या पायावर उभे करुन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्याकरता प्रयत्न होणे आवश्यक आहे. सैनिकांना अडचणीच्या काळात मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. तेच काम क्विन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट सातत्याने करत आहे. सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर कुलकर्णी, विक्रांत मोहिते, अमर लांडे, कुणाल जाधव, सचिन ससाणे, अनुप थोपटे, उमेश कांबळे, अभिषेक पायगुडे, सुरेश तरलगट्टी यांनी आयोजनात सहभाग घेतला. शिरीष मोहिते यांनी प्रास्ताविक केले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...