आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन लैंगिक अत्याचार:विशेष न्यायालयाने आरोपीस सुनावली दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पुणे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला विशेष न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार (पॉक्सो) स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा आदेश दिला आहे.

गणेश सखाराम कदम (वय 27, रा. तळवडे,पुणे मूळ रा. ढाळेवाडी, ता. पाटोदा, बीड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात बलात्कार, अपहरण आणि पॉक्सो कायद्याच्या कलमान्वये चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 21 डिसेंबर 2018 रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास तळवडे परिसरात घडली. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून आधी पंढरपूर व नंतर शिर्डी येथे नेले. तिथे भाडेतत्वावर घेतलेल्या खोलीत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

सरकार पक्षातर्फे 6 साक्षीदार

या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीला पाटोदा बस थांब्यावरून ताब्यात घेतले. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी गणेश विरोधात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासले. सरकार आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक निलेश दरेकर यांनी न्यायालयीन कामकाजात साह्य केले.

बातम्या आणखी आहेत...