आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Aacharya Atre Smuti Patrakarita Award: Inspired To Play A Role With The Common Man At The Center: Sanjay Awate; News And Live Updates

आचार्य अत्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार:सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून भूमिका मांडण्याची प्रेरणा अत्रेंनी दिली : संजय आवटे

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांना रविवारी माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  - Divya Marathi
दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांना रविवारी माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
  • अत्रे यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक पुण्यात व्हावे - माजी आमदार उल्हास पवार

कामाचे क्षेत्र कुठलेही असो, सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवत, भूमिका घेऊन मांडणी करण्याची प्रेरणा आचार्य अत्रे यांच्या लेखनातून आणि चरित्रातून मिळते. त्या प्रेरणेतूनच आजच्या संकटाच्या, नकारात्मक वातावरणात चांगले काम करण्याचे आव्हान पेलण्याची शक्ती मिळत आहे, असे प्रतिपादन “दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे यांनी रविवारी पुण्यात केले.

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात संजय आवटे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत मांडले. ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी लेखक राजन खान आणि प्रा. मिलिंद जोशी (आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार), ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर (पत्रकारिता पुरस्कार) आणि अभिनेत्री श्रेया बुगडे (अत्रे कला पुरस्कार) यांनाही पुरस्कार देण्यात आले.

आवटे म्हणाले, “अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार प्रतिष्ठेचा तर आहेच, पण तो मानाने मिरवावा, असाही आहे. शिक्षण, चित्रपट, नाटक, राजकारण, समाजकारण, पत्रकारिता, साहित्य, कला, वक्तृत्व ही सारी माध्यमे अत्रे यांनी ताकदीने वापरली. फुले, आंबेडकर, गाडगेबाबा यांच्याशी त्यांची नाळ जोडलेली होती. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवत ते कार्य करत राहिले. हीच प्रेरणा घेऊन आजच्या काळातील परिस्थितीला सामोरे जायचे आहे.’

महाराष्ट्रात आचार्य अत्रे उपेक्षित राहिले, अशी खंत व्यक्त करत उल्हास पवार म्हणाले, “आचार्य अत्रे यांनी भूमिका घेतली. ते फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचे पाईक होते. मी पुण्याचा अत्रे असलो, तरी सदाशिव पेठेतला अत्रे नसून मी गंजपेठेतला अत्रे आहे, असे ते जाहीररीत्या सांगत असत. पराग करंदीकर, राजन खान, श्रेया बुगडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी प्रास्ताविक केले. अण्णासाहेब खाडे यांनी आभार मानले.

अत्रे यांचे स्मारक असावे
पुण्यात आचार्य अत्रे यांचा पुतळा दुर्लक्षित आहे. अत्रे यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक पुण्यात व्हावे आणि अत्रेंचे साहित्य, त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांची विचारधारा समजून घेण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू व्हावी. अत्रेंच्या विनोदात केवळ हास्य नव्हते, तर त्या हास्यामागे वेदना लपलेली असायची. अत्रेंसारख्या महान साहित्यिकाला महाराष्ट्र विसरला ही एक शोकांतिका आहे, अशी भावना उल्हास पवार यांनी मांडली.

बातम्या आणखी आहेत...