आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे जिल्ह्यात नागरिकांच्या आधार अद्ययावतीकरणाला वेग आला असून यासाठी शासकीय सुट्टीच्या दिवशीही आधार सेवा केंद्र सुरू राहणार आहेत. आधार अद्ययावतीकरण करणे बाकी असलेल्या सर्व नागरिकांनी आधार केंद्रात जाऊन अद्ययावतीकरण करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी केले आहे.
आधार अपडेट करणे प्रलंबित
ज्या नागरीकांनी 2012 पूर्वी आधार कार्ड काढलेले आहे, परंतु मागील 19 वर्षामध्ये अद्ययावत (अपडेट) केलेले नाही अशा नागरीकांनी त्यांचे आधार अद्ययावत करून घेणे गरजेचे आहे. सदयस्थितीत पुणे जिल्ह्यात 30 लाख 26 हजार 823 इतक्या नागरीकांचा आधार तपशील अद्ययावत करणे प्रलंबित आहे.
आधार अद्ययावतीकरणाला वेग देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी उपजिल्हाधिकारी आणि आधारच्या जिल्हा नोडल अधिकारी रोहिणी आखाडे यांच्या उपस्थितीत आधारचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक मनोज जाधव, जिल्ह्यातील आधार नोंदणी करणाऱ्या बँका, पोस्ट कार्यालय, महिला व बालविकास विभागाचे प्रतिनिधी तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आधार नोंदणीबाबतचे समन्वय प्रमुखांची बैठक आयोजित केली होती.
आधार अपडेट पंधरवाडा
यावेळी जिल्ह्यातील नागरिकांच्या सोईसाठी सर्व आधार सेवा केंद्रे शासकीय सुट्टीच्या व साप्ताहिक दिवशीही सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. विशेष मोहिम म्हणून 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये तालुका, मंडल, क्षेत्रिय कार्यालय स्तरावर ‘आधार डॉक्युमेंट अपडेट पंधरवडा’ राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
14 जूनपर्यंत मोफत
‘माय आधार’ ॲप आणि आधार संकेतस्थळाचा अवलंब करुन नागरिक आपले आधारमधील नाव, पत्ता, मोबाईल नं., जन्मतारीख, भाषा अद्ययावत करु शकतात. आधार सेवा केंद्रामध्ये आधार तपशील अद्ययावतीकरणासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागते. मात्र, या ॲप व संकेतस्थळावरुन 14 जून 2023 पर्यंत नागरिकांनी स्वत: आधार अद्ययावतीकरण केल्यास त्यासाठी कोणतेही शासकीय शुःल्क आकारण्यात येणार नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.