आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात निवडणूकीनंतर राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळालेल्या आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केले असून पक्षाची भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी 'स्वराज्य यात्रे'ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून पक्षाची जनजागृती राज्यभरात करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव व प्रदेश सह-प्रभारी युवा नेते गोपाल इटालिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी मुकुंद किर्दत, विजय कुंभार, धनंजय शिंदे, विजय फाटके उपस्थित होते.
इटालिया म्हणाले, स्वराज यात्रेची सुरुवात 28 मे रोजी पंढरपूर येथून सुरू होणार असून 6 जून राज्याभिषेक दिनी रायगड येथे यात्रेची सांगता होणार आहे. स्वराज्य यात्रा सात जिल्ह्यातून जाणार असून या जिल्ह्यातील शहरे व गावांमध्ये पक्षाचे सभा होणार आहेत. 782 किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करेल.आज महाराष्ट्रात सर्वत्र प्रशासनच राज्य करत आहे. देशातला आणि जगातली सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणारा भाजप महाराष्ट्रात मात्र हरण्याच्या भीतीने एकही निवडणूक होऊ देत नाही आणि त्यामुळेच प्रशासन मनमानी कारभार करते आहे. भ्रष्टाचारावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. या दडपशाही विरोधात आवाज उठवत सुराज्य आणण्यासाठी आम आदमी पार्टी प्रयत्न करेल.
पुढे ते म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीनंतर विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने युत्या करत सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न केले. या सर्वच प्रस्थापित पक्षांची विश्वासार्हता संपली असल्यामुळेच महाराष्ट्रातील जनता नवीन पर्याय शोधते आहे आणि आम आदमी पार्टी आज काम की राजनीती करणारा नवा पर्याय म्हणून समोर येत आहे.गेले वर्षभर भाजप - शिंदे गटाचे खोक्यांचे आणि बोक्यांचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे . एकमेकांवरती टीका करताना जनतेच्या प्रश्नांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे अशी भावना शेतकरी, कष्टकरी, गृहिणी, युवक, सामान्य नागरिक अशा सर्वच वर्गाची झाली आहे. एकीकडे वाढती महागाई असताना शेतकऱ्यांचे, नोकरीचे प्रश्न तसेच शाळा फी दवाखाने आदी प्रश्नाबाबत प्रस्थापित विरोधी पक्ष सुद्धा आवाज उठवण्यास तयार नाहीत. अशा वेळेस सामान्य जनतेचा म्हणजेच रयतेचा आवाज बनून आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरू पाहत आहे.
येणाऱ्या वर्षभरात स्थानिक तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत. आम आदमी पार्टी आता सर्वच निवडणुका लढवण्याची तयारी करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वेगळ्या गावांमधून पश्चिम महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांमधून ही यात्रा काढली जाणार आहे.
यात्रे दरम्यान आम आदमी पार्टीचे शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील काम, दिल्ली मॉडेल चे यश आणि फायदे हे जनतेस सांगण्यात येणार आहेत. यात्रेच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मजबूत संघटन बांधणीची तयारी आप करीत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.