आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमप्रकरणाच्या संशयावरून युवकाचे अपहरण:बेदम मारहाणही केली; संशयितांना अटक, पुण्यातीत घटना

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमप्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन युवकाचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला आहे. युवकाचे अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी तन्मय दिपक पाचरणे (वय 20, रा. पाचरणे आळी, वाघोली), वेदांत महादेव गपाट (वय 19, रा. शंकरनगर, खराडी) यांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे घटना?

याबाबत करण शंकर माळी (वय 19, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) याने या संदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. करणने संगणकविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सध्या तो एका हॉटेलमध्ये अर्धवेळ काम करत आहे. वाघोलीतील एका महाविद्यात करण, तन्मय आणि एक युवती शिक्षण घेत होते. करण मित्रांना भेटून दुचाकीवरुन कामाला निघाला होता. त्या वेळी आरोपी तन्मयने करणच्या मोबाइलवर संपर्क साधला. दुचाकी बंद पडल्याची बतावणी करुन त्याला मुंढवा परिसरात बोलावले. तन्मयने करणला दुचाकीवरुन सोडण्यास सांगितले. काही अंतरावर तन्मयचे मित्र वेदांत आणि साथीदार मोटारीत होते. तन्मयने करणला मोटारीत बसण्यास सांगितले. करणला संशय आला. त्याने मित्राच्या मोबाइलवर संपर्क साधला. तेव्हा तन्मयने त्याचा मोबाइल काढून घेतला.

तरुणाला दिली धमकी

तन्मय, वेदांत आणि साथीदारांनी करणला मोटारीत मारहाण केली. महाविद्यालयातील मैत्रिणीशी तुझे प्रेमप्रकरण सुरू असून तिच्याशी संबंध ठेवू नको, असे सांगून तन्मयने त्याला धमकावले. मुंढवा रस्त्यावरील एका खोलीत त्याला डांबून ठेवले. त्याला दारु पाजली. त्याच्या डोक्यात दारुची बाटली फोडली. करणला बांबू आणि गजाने बेदम मारहाण केली. मारहाणीत करण बेशुद्ध पडला. त्यानंतर आरोपी तन्मय आणि साथीदारांनी त्याला खराडी परिसरात सोडून दिले. करणने या घटनेची माहिती भावाला दिली. त्यानंतर चंदननगर पोलिस ठाण्यात त्याने तक्रार दिली. पोलिसांनी तपास करुन दोघांना अटक केली. करणवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

मॉडेल कॉलनीत भरदिवसा घरफोडी

मॉडेल कॉलनी भागात भरदिवसा सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील चार लाख 64 हजारांचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत निकिता कोद्रे (वय 42, रा. जानकी अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोद्रे सदनिका बंद करुन दुपारी पावणेबाराच्या सुमारास बाहेर पडल्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलुप तोडून शयनगृहातील कपाट उचकटले. कपाटातील 500 रुपयांची रोकड आणि चार लाख 64 हजार रुपयांचे दागिने असा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. कोद्रे दुपारी दोनच्या सुमारास घरी परतल्या. तेव्हा सदनिकेचे कुलुप तोडल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...