आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात RSSचे बनावट खाते:आरोपी करायचा शिवाजी महाराज, जिजामातांच्या नावाने आक्षेपार्ह पोस्ट; गुन्हा दाखल

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोशल मीडियावर बनावट खाते उघडल्याचे समोर आले आहे.

'RSS संघराज' या नावाने हे खोटे खाते तयार करून त्याद्वारे लोकप्रतिनिधी आणि छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता यांचा बाबत आक्षेपार्ह विधान करून बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गुन्हा केला दाखल

याप्रकरणी संघाच्या वतीने याबाबत संघाचे पदाधिकारी महेश संभाजी करपे (वय - 50, रा. चंदननगर, पुणे) यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात भादवि कलम 453 अ, 465, 469, 471, 500, 505/2 आयटी अ‍ॅक्ट 66 सी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

नेमके प्रकरण काय?

एबीपी माझा या इलेक्ट्रॉनिक मराठी न्यूज चॅनेलच्या लाइव्ह प्रसारणा दरम्यान बातम्यांचे खाली लाइव्ह चॅट या सदरात 'RSS संघराज' या बनावट खाते धारकाने तक्रारदार यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नावे खोटे खाते तयार केले. त्याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता यांचे संबंधाने आक्षेपार्ह, बीभत्स मजकूर व राष्ट्रपुरुषांचे बाबतीत खोटा इतिहास प्रसारीत करुन त्यांची त्याव्दारे बदनामी करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत जनमानसात गैरसमज पसरवून दोन वर्गामध्ये व्देष भावना पसरविल्याने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

कारवाईची केली मागणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे म्हणाले, जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने व संघ तसेच संघ विचारांनी चालविल्या जाणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यासंबंधाने पोलिस, सायबर यंत्रणांनी वेळीच दखल घ्यावी, समाजात तेढ निर्माण करणारा अपप्रचार व आपली सर्वांची श्रद्धा असलेल्या महापुरूषांची बदनामी रोखावी.`RSS संघराज` नामक फेसबुक पेज हे बनावट असून रा. स्व. संघाकडून वा स्वयंसेवकांकडून असा कोणत्याही प्रकारचा मजकूर प्रसिद्ध केला गेलेला नाही. रा.स्व. संघ व संघ स्वयंसेवकाची बदनामी करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक असा मजकूर पसरवला जातो आहे. पोलिस व संबंधीत सायबर यंत्रणांनी याची दखल घेत चौकशी करावी व तातडीने कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...