आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:कोविड कक्षात उपचारासाठी न जाणाऱ्या डाॅक्टरांवर कारवाई, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला इशारा

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जनजागृतीवर भर द्या : अजोय मेहता

कोविड रुग्णांवर उपचार करताना नॉन कोविड रुग्णाकडे दुर्लक्ष होता कामा नये, काही रुग्णालयांमध्ये डॉक्टर कोविड कक्षामध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा डॉक्टरांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यांनतर शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात ये-जा करत असल्यामुळे या भागात कोरोनाचा प्रसार होताना दिसून येत आहे. ग्रामीण भागात विविध समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने कोरोना विषाणूच्या संसर्गावर कसे नियंत्रण मिळवता येईल, यासाठी योजना तयार करा. शहरातून ग्रामीण भागात तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी पोलिसांनी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचनाही पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

उपाययोजनांबाबतही नाराजी
विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीमध्ये अजित पवारांनी पुण्याच्या कोरोना नियंत्रणावरील कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. यासोबतच सध्या सुरु असलेल्या उपाययोजनांबाबतही नाराजी व्यक्त केली.तसेच कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यात टेस्टिंग इन्चार्ज म्हणून स्वतंत्र आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

लग्न सोहळ्यात 50 पेक्षा जास्त लोक 

अजित पवार म्हणाले की, लॉकडाऊन निर्बंध शिथिल झाले असले तरीही अधिकाऱ्यांची, प्रशासनाची जबाबदारी संपलेली नसते. नागरिक मास्क न वापरता वावरताना दिसत आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये 50 ची मर्यादा आहे. मात्र तरीही 50 पेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहत आहेत. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. एकिकडे मुंबईत रुग्ण संख्या आटोक्यात येत आहेत. मग पुण्यात नेमकी अडचण काय? असा सवालही अजित पवार यांनी केला.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढताना दिसून येत आहे. यासाठी विभागीय आयुक्तांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जनजागृतीवर भर द्या : अजोय मेहता

मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले, ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती आटोक्यात आण्यासासाठी कम्युनिटी लिडर्सची मदत घ्या. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनातील कोरोनाविषयक भीती घालविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या, या गोष्टी करतांना प्रतिबंधित क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करा, बाधित रुग्ण शोधण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवा. त्यांचे तपासणी अहवाल लवकरात लवकर प्राप्त करा, जेणेकरून सामूहिक संसर्ग पसरणार नाही. एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची तात्काळ तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...