आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील वानवडीच्या पनीर कारखान्यावर कारवाई:800 किलो बनावट पनीर जप्त; यापूर्वीही झाली होती कारवाई

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने वानवडी येथील बनावट पनीर तयार करणाऱ्या मे. टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारुन बनावट पनीर बनवित असल्याचे आढळून आल्याने कारवाई करुन साठा जप्त करण्यात आला.कारखान्यावर छापा टाकला असता 800 किलो बनावट पनीर तयार करून ठेवल्याचे आढळले.

हे पनीर तयार करण्यासाठी 350 किलो स्किम्ड मिल्क पावडर व 270 किलो पामोलिन तेल साठविल्याचे आढळले. साठ्यातुन तपासणीसाठी नमुने घेत किंमत 1 लाख 67 हजार 790 रूपये किमतीचे 799 किलो पनीर, 1 लाख 21 हजार 800 रूपये किमतीचे 348 किलो स्किम्ड मिल्क पावडर, 39 हजार 664 रूपये किमतीचे 268 किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण 3 लाख 29 हजार 254 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन यांनी सोमवारी दिली आहे.

पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. सदर नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सहायक आयुक्त बाळू ठाकूर, अन्न सुरक्षा अधिकारी निलेश खोसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

यापूर्वी ही नकली पनीर कारखान्यावर कारवाई

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील मे. आर. एस डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर पाच सप्टेंबर रोजी छापा मारुन नकली पनीर साठा जप्त करण्यात आला.या कारखान्यावर छापा टाकून 1 लाख 97 हजार 780 रुपये किंमतीचे 899 किलो नकली पनीर, पनीर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी 2 लाख 19 हजार 600 रुपये किंमतीची 549 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 4 हजार 544 रुपये किंमतीचे 28.4 किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण 4 लाख 21 हजार 924 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...