आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायलचा चर्चेत राहण्यासाठी खटाटोप:नेहरू, गांधी बदनामीप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगीवर गुन्हा दाखल; आता गांधी, नेहरू परिवारावर चिखलफेक

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी, नेहरू आणि गांधी परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगी हिच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरून पायल रोहतगी व व्हिडिओ तयार करणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व त्यांचे कुटंबीय, काँग्रेस परिवार यांच्याविषयी खोटा व बदनामीकारक व्हिडिओ तयार करून तो सोशल मिडियावर पायल रोहतगी हिने प्रसारित केला. त्यातून हिंदू -मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतचा व्हिडिओ तिवारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी व्हॉट्सऍपवर पाठवला होता. त्यानंतर याबाबत दखल घेत संगीता तिवारी यांनी अगोदर ही तक्रार सायबर पोलिसांकडे दिली होती. सायबर पोलिसांनी ती शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग केली आहे.

पायलचा चर्चेत राहण्यासाठी खटाटोप
पायल रोहतगी नेहमीच वादग्रस्त पोस्ट करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. तिने दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. यापूर्वी ट्विटरने खोट्या व बदनामीकारक पोस्ट टाकल्याने पायल हिचे अकाऊंट अनेक वेळा बंद केले आहे. हैदराबाद येथील सामुहिक बलात्कार प्रकरणात सांप्रदायिक ट्विट केल्याने तिच्यावर एक आठवड्याची बंदी घालण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅन्डलने रोहतगी ला २०१९ मध्ये ब्लॉक देखील केले होते. जून २०१९ मध्ये पायल रोहतगी हिने शिवाजी महाराज यांच्याविषयी बदनामीकारक टिप्पणी केली होती. त्याविरुद्ध राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार करुन तिच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर तिने माफी मागणारा व्हिडिओ प्रसारित केला होता.

आता गांधी, नेहरू परिवारावर चिखलफेक
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे मोतीलाल नेहरू यांचे वैध अपत्य नाही, असा व्हिडिओ तिने ऑक्टोबर २०१९ मध्ये फेसबुकवर टाकला होता. त्याविरुद्ध काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर तिने प्रियंका गांधी व सोनिया गांधी यांची जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर पुन्हा १५ डिसेंबर रोजी तिने नेहरू गांधी परिवारावर टिप्पणी केली होती. यावरून अहमदाबाद पोलिसांनी तिला अटक केली होती. न्यायालयाने तिला दुसऱ्या दिवशी जामिनावर सोडले होते. त्यानंतर जुलै २०२०मध्ये ट्विटरने तिचे अकाऊंट पुन्हा एकदा निलंबित केले होते. त्यानंतर आता पायल रोहतगीविरुद्ध गांधी-नेहरू यांच्याविषयी विखारी वक्तव्य केल्यावरून पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...