आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतर गडचिराेलीत 52 गावे उजळले, नागरिकांचा आंनदोत्सव

पुणे / मंगेश फल्ले7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यातील आदर्श मित्रमंडळाच्या माध्यमातून काम पूर्णत्वास

टाेलेजंग इमारती...चकचकीत माॅल..विजेचा झगमगाट..रस्त्यावरील वाहनांची माेठी वर्दळ अशा शहरी वातावरणात राहणाऱ्या लाेकांना दिवस-रात्र वीज माेठ्या प्रमाणात वापरण्याची सवय लागली आहे. काही काळासाठी जरी वीज नसेल तर अनेकांची अस्वस्थता दिसून येते. मात्र, गडचिराेली जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील अनेक गावे आणि वाड्या-वस्त्या येथे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही अद्याप वीज पोहाेचली नसल्याने अंधकारमय जीवन जगण्याची अनेकांना वर्षानुवर्षे सवय झाली आहे. परंतु पुण्यातील आदर्श मित्रमंडळाच्या पुढाकाराने मागील दाेन वर्षांच्या प्रयत्नाने ५२ गावे आणि १३५० घरे प्रथमच प्रकाशमान झाली असून एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आदर्शवत काम कशा प्रकारे उभे राहू शकते याची अनुभूती दिसून येत आहे.

गडचिराेलीतील वेगवेगळ्या गावातील मुले चार वर्षांपूर्वी पुणे दर्शनास आली असताना त्यांना आदर्श मित्रमंडळाचे अध्यक्ष उदय जगताप हे पुण्यातील विविध गाेष्टींची माहिती करून देत असताना ई-लर्निंगबाबत माहिती देत हाेते. मात्र, मुलांनी त्यांच्या गावात अनेक वर्षांपासून वीजच नसल्याचे सांगितले आणि रात्रीचा अभ्यास करण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे भामरागड, एेटापल्ली तालुक्यातील ५२ गावांत वीज पाेहोचवण्याच्या दृष्टीने प्रश्न हाती घेण्यात आला व सुरुवातीला बाेलेपल्ली, देवदा, हेटलकसा आदी पाच गावांतील शाळांत प्रथम साेलर वीज पाेहोचवण्यात आली. परंतु बाेलेपल्ली, देवदा या गावातच जगताप यांच्यासह सहकाऱ्यांना सशस्त्र १९ नक्षलवादांच्या राेषास सामाेरे जावे लागले. गडचिराेलीतील आधार फाउंडेशनचे डाॅ. रणजितसिंग सलुजा आणि श्री लक्ष्मी नृसिंह पतसंस्थेचे श्रीनिवास सुंजुवार यांनी नेमकी काेणत्या गावांना विजेची गरज आहे याचा अभ्यास करून ५२ गावांची निवड करून देत ग्रामस्थांशी बाेलणी सुरू केली.

नक्षलवाद्यांच्या भीतीने काही गावांत साेलर विजेचे खांब लावण्यास विराेधही झाला, परंतु त्यांची समजूत काढल्यानंतर प्रश्न मार्गी लागला. संबंधित गावांमध्ये साेलरचे खांब पाेहोचवून गावे प्रकाशमान करणे हे जिकिरीचे काम हाेते. नक्षलवादी हल्ल्याची टांगती तलवार, काही गावांत पाेहोचण्यासाठी रस्ते नव्हते. पाच-पाच किलाेमीटर खांद्यावर खांब वाहून नेणे, पैशांची चणचण यावर मात करत ही गावे प्रकाशमान करण्यात आली. दरम्यान, येथील गावकऱ्यांनी गावे उजळल्याने समाधान व्यक्त केले आहे.

गडचिराेलीत १३५० घरे उजळली
आदर्श मित्रमंडळाचे उदय जगताप म्हणाले, नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या नागरिकांना वीज नसल्याने अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत हाेता. ही अडचण लक्षात आल्यानंतर कामास सुरुवात केली आणि त्याची खूप माेठी गरज असल्याचे दिसून येत आहे. अनेक घरांत वीज नसल्याने मुलांच्या अभ्यासावर आणि आराेग्यावर परिणाम व्हायचा. त्यामुळे आतापर्यंत १३५० घरांत साैरदिवे देऊन ती घरे प्रकाशमान करण्यात आली. गावांमध्ये प्रथमच वीज पाेहोचत असल्याने येथील गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान जाणवत असल्याचे दिसते.

बातम्या आणखी आहेत...