आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, किटकनाशकांची अजिबात कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी; बियाणे, कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेवर लक्ष द्यावे आणि भरारी पथके कार्यान्वित करुन चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करत गैरप्रकारांना आळा घालावा, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी येथे दिले.
विधानभवन येथे आयोजित पुणे महसूल विभाग खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सौरभ राव, राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण, ‘स्मार्ट’चे प्रकल्प संचालक कौतुभ दिवेगावकर, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सांगली जिल्हाधिकारी राजा दयानिधी, सातारा जिल्हाधिकारी रूचेस जयवंशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आदी उपस्थित होते.
पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागाने आणि विद्यापीठांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे सांगून सत्तार म्हणाले, कृषी विद्यापीठांनी पिकांचे नवनवीन वाण तयार करुन त्यांचा प्रचार प्रसार करावा. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पौष्टिक तृणधान्य लागवडीला चालना द्यायची असून ज्वारी, बाजरी, नाचणी आदींना लागवडीला वाढ आणि उत्पादकता वाढीसाठी उपाययोजना कराव्या. तेलबियांच्या लागवडीला चालना द्यावी. पारंपरिक पिकांऐवजी पर्यायी पिकांकडे कसे वळता येईल याचा विचार करावा,'.
प्रधान सचिव डवले म्हणाले, केंद्र शासनाचा पीक विविधीकरण (क्रॉप डायव्हर्सिफिकेशन) हा प्राधान्याचा कार्यक्रम असून त्यासाठी सर्व जिल्ह्यांनी प्रयत्न करावेत. तृणधान्य आणि सूर्यफूल, जवस, करडई, मोहरी आदी तेलबियांकडे क्षेत्र वळवले पाहिजे. तूरीच्या लागवडीस चालना द्यायची आहे. जेथे यापूर्वी लागवड होत नव्हती अशा अपारंपरिक क्षेत्रात नाचणी लागवडीला प्रोत्साहन द्यावे, असेही ते म्हणाले.
विभागीय आयुक्त राव यांनी नैसर्गिक शेती, आरोग्यवर्धक खाद्यपदार्थांना चालना देण्यासह कृषी निविष्ठांच्यर भर देण्याची गरज व्यक्त केली. पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा बनवून जास्तीत जास्त प्रसार करावा, असे ते म्हणाले. कृषी आयुक्त चव्हाण यांनी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा पुरवठा वेळेत होण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले.
यामध्ये बियाणे, खते, किटकनाशकांची मागणी, उपलब्धता आणि पुरवठ्याचे नियोजन, यांत्रिकीकरण अंतर्गत कृषी अवजारांसाठी अर्थसहाय्य, फळबाग लागवड, ठिबकसह सूक्ष्म सिंचन, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना तसेच अन्य योजनांचा, कृषीपंप वीजजोडणी, धरण प्रकल्पातील पाणीपरिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यात निर्यातक्षम केळी लागवड मोठ्या प्रमाणात होत असून त्याला चालना देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बेदाणा साठवणुकीसाठी शीतगृह उभारणीसाठी आर्थिक मदतीची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.