आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

विठ्ठला तुझी रे किती रूपं:आळंदीच्या पायऱ्यांवर वावरतेय भक्तीचे ‘अजय’ रूप, आई-वडिलांना मदत करण्यासाठी सात वर्षांच्या चिमुकल्याची वणवण

आळंदीएका महिन्यापूर्वीलेखक: रवी खंडाळकर
  • कॉपी लिंक
  • हा चिमुकला विठ्ठलभक्तीचे ‘अजय’ रूप म्हणून वावरत आहे

आळंदीचा मंदिर परिसर, साऱ्यांचीच लगबग चाललेली. अनेकांच्या मनात विठ्ठल, मुखी पांडुरंगाचे नामस्मरण आणि हात जोडलेले हे वारकरी मंदिर परिसरात दाखल होतात तोच एक चिमुकला त्यांच्या मागे धाव घेतो. माउली.. गंध लावा ना ओ.. अशी आर्त हाक देतो आणि जणू आपल्याला विठ्ठलानेच हाक मारली या आविर्भावात भाविक जागीच थबकतात. या चिमुकल्या विठ्ठलाचे देखणे व सावळे रूप पाहून जणू त्यांना विठ्ठल दर्शनाचीच अनुभूती होते. हा विठ्ठल त्यांना गंध लावतो. कपाळी थंडावा जाणवतो आणि आपसूकच डोळ्यात पाणी येते. आळंदीच्या मंदिर परिसरात हा चिमुकला विठ्ठलभक्तीचे ‘अजय’ रूप म्हणून वावरत आहे.

जवळपास सात वर्षांचा अजय तानाजी गायकवाड लॉकडाऊनपूर्वी छान शाळेत जायचा. अभ्यास करायचा. आईसोबत कामाला जायचा. पण आता सारंच बदललं आहे. त्याच्या चिमुकल्या पायांना मंदिर परिसरात फेऱ्या माराव्या लागतात. ऊन नाही, पाऊस नाही, कशाचीही तमा न बाळगता हा फिरतो. लोकांच्या कपाळी गंध लावतो आणि त्यांच्याकडून जे काही दक्षिणा म्हणून मिळेल ते स्वीकार करून जग जिंकल्यागत दुसऱ्या भक्ताच्या शोधात निघतो.

अजयला ना कोरोनाची धास्ती ना पुढे काय होईल याची. दुसरीतला अजय येणाऱ्या प्रत्येकालाच सांगत असतो. ‘ती माउली आहे आपल्या पाठीशी. सारं काही छान होणार.’ अजयचे वडील रोजंंदारीवरची कामं करायचे. आई दिवे तयार करायची. आता दोघांनाही रोजगार नाही. मग या पठ्ठ्याने हातात गंधाचा आकडा घेतला आणि निघाला कमाई करायला. रोजचे या अजयला किमान शंभर रुपये मिळत असतील. कधी कधी काहीच मिळत नाही. पण हा हार मानत नाही. गंध घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी दिसतोच मंदिरात कपाळी टिळा लावताना.

बघा पोटी जन्मला विठ्ठल

अजय हा शांत बसणाऱ्यांतला नाही. काही नाही तर सुट्टीत गंध लावतो म्हणाला लोकांना. स्वत: त्याने हे करण्याचा निर्णय घेतला आणि निघाला मंदिराकडं. आजही त्याच्यामुळेच आमच्या घरात थोडाफार पैसा येतो. रोजचा खर्च भागतो. विठ्ठलच जन्मलाय बघा आमच्या घरात... - तानाजी गायकवाड, अजयचे वडील.

0