आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैव बलवत्तर:आजीबाई वेळेत हजर झाल्या, बालिकेचे अपहरण टळले! आत्या बनून आली महिला, पुण्यातील प्रकार

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेतून सुटलेली मुले गेटवर आल्यानंतर यूकेजीमध्ये शिकणाऱ्या मुलीची आत्या असल्याचे सांगून तिचे अपहरण करणाऱ्या महिलेचा डाव मुलीच्या आजीच्या दक्षतेमुळे फसला. या वेळी शाळेतील सुरक्षा रक्षकांनी संबंधित महिलेला पकडून खडकी पोलिसांच्या हवाली केले. छाया युवराज शिरसाठ (२८, रा. अकोला) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर तिची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. याबाबत ५ वर्षांच्या पीडित मुलीच्या वडिलांनी खडकी पोलिस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली आहे.

अटक करण्यात आलेली महिला ही मूळची अकोल्याची आहे. पतीपासून वेगळी राहत असल्याने ती मानसिक तणावाखाली आहे. खडकी परिसरात एस. व्ही. एस. हायस्कूल नावाची शाळा आहे. त्या शाळेत फिर्यादी यांची मुलगी आणि त्यांच्या लहान भावाचा मुलगा शिकण्यास आहे. फिर्यादी यांची आई त्यांच्या लहान भावाकडे राहते. त्यांची आई लहान मुलाच्या मुलाला रोज शाळा सुटल्यानंतर घ्यायला जाते, तर फिर्यादी आपल्या मुलीला शाळेत नेण्यासाठी येतात. मंगळवारी दोन्ही पाल्यांना शाळेत सोडण्यात आले होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शाळेतील सर्व मुले शाळा सुटल्यानंतर गेटवर आली होती. त्या वेळी छाया शिरसाठ ही गेटवरील सुरक्षा रक्षकांना भेटली. तिने सुरक्षा रक्षकांना संबंधित मुलीची मी आत्या असल्याचे सांगितले. त्यांनी त्या मुलीला तिच्याकडे दिल्यानंतर ती मुलीला हाताला धरून घेऊन चालली होती. त्या वेळी वेळेच्या आधी शाळेच्या गेटवर आलेल्या आजीने हा सर्व प्रकार पाहिला. तिने छायाला थांबवत “तू कोण ? तू मुलीला कुठे घेऊन चाललीस?’ अशी विचारणा केली. त्यावर तिने मी मुलीची आत्या असल्याचे सांगितले. त्यावर आजीने “तू काही तिची आत्या नाही’ म्हणत असताना फिर्यादीही तेथे आले. फिर्यादींनी तसेच तेथील सुरक्षा रक्षकांनी तिला पकडून ठेवून ११२ या पोलिस मदत कक्षाला फोन करून संबंधित महिलेबाबत सांगितले. त्यानंतर तात्काळ खडकी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. संबंधित महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर तिला अटक करण्यात आली. या वेळी तिच्याकडे विचारणा केल्यानंतर ती पतीपासून विभक्त राहत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तिला कोर्टात हजर केले असता तिची रवानगी सध्या येरवडा कारागृहात झाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी सांगितले.

प्रकार टाळण्यासाठी शाळांनीही दक्षता घ्यावी असे प्रकार टाळण्यासाठी शाळांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक वाढवले पाहिजेत. शाळेत पालकांजवळ आयडी कार्ड दाखवल्यानंतरच मुलांचा ताबा दिला पाहिजे. तसेच बायोमेट्रिकसारखी पद्धत वापरून नातेवाइकांना गेटच्या आतमध्ये घेतल्यास आणखी मुले सुरक्षित वातावरणात राहतील. गेटमधून थेट मुले ताब्यात न देता गेटच्या आतूनच मुलांनाही पालकांच्या ताब्यात देणे गरजचे वाटते.

आरोपी महिला पालकांच्या गर्दीत होती उभी महिला मानसिकरीत्या तणावाखाली आहे. तिला तिच्या पतीने सोडून दिले आहे. तिने या मानसिक तणावाखाली हा प्रकार केला. तिला त्या मुलीला न्यायचे असे काही नियोजन केले नव्हते. सगळी मुले सुटल्यानंतर ती गेटवर आल्यानंतर पालकांनी गेटवर गर्दी केली होती. प्रत्येक नातेवाईक एककेका पाल्याला घेऊन घरी जात होते. ही महिलाही त्या गर्दीत शिरली. तिने थेट फिर्यादीच्या मुलीच्या हाताला धरले आणि ती पुढे चालू लागली. हा प्रकार पीडित मुलीच्या आजीने पाहिला.

बातम्या आणखी आहेत...