आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:मला भरपूर कामे आहेत, कोणी काहीही बोलू शकतो, अजितदादांनी सोमय्यांच्या आरोपांवर बोलणे टाळले

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मला भरपूर कामे आहेत. कोणी काहीही बोलत बसेल. मला त्यावर बोलायला वेळ नाही, माझे काम भले आणि मी भला,’ असे सांगत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या आराेपांवर बोलणे टाळले.

पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) मंगळवारी संचालक मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, विशेष कार्यकारी अधिकारी संभाजी कडू पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यात सध्या नेत्यांकडून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते काय बोलतील याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. परंतु बैठकीनंतर शरद पवार प्रसारमाध्यमांशी काहीही न बोलता निघून गेले. त्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. पत्रकारांनी उपमुख्यमंत्री पवार यांना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, ‘कोणीही काहीही बोलत बसेल. त्यावर बोलायला मला काही मोकळा वेळ नाही. मला भरपूर कामे आहेत. मी भला आणि माझे काम भले,’ असे म्हणत ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जाताना ‘चला जयंतराव’ म्हणत त्यांना गाडीत बोलावले. त्यानंतर वळसे-पाटील यांनी दादा नाही बोलले, मी काय बोलणार, असे म्हणत तेही रवाना झाले. आ.रोहित पवारही मी काय बोलणार म्हणत निघून गेले.

बातम्या आणखी आहेत...