आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये त्यांनी बूस्ट डोस संदर्भात निर्णय घेण्याचा चेंडू सरकारच्या पारड्यात टाकला आहे. यासोबतच, राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतरही अनेक ठिकाणी शाळा सुरू झालेल्या नाहीत. यावर लवकरच राज्य सरकार निर्णय घेणार असे अजित पवारांनी सांगितले आहे.
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनबाबत जगभरात दहशतीचे वातावरण आहे. भारतात स्थानिक पातळीवर सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. त्यातच कोरोना लसीचा तिसरा डोस अर्थात बूस्टर डोस संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यामध्ये तज्ज्ञांनी उपमुख्यमंत्र्यांना काही सूचना दिल्या आहेत.
सीरमकडे बूस्टर डोस उपलब्ध, केंद्राने निर्णय घ्यावा
बूस्टर डोस संदर्भात बोलताना अजित पवार पुढे म्हणाले, सध्या सर्व नागरिकांचे दोन्ही डोस (कोरोना लसींचे) कसे पूर्ण होतील यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांना ओमायक्रॉनचा फार काही त्रास होत नाही असे दिसून आले आहे. तसेच काही लोकांना बूस्टर डोस घेतल्यानंतरही त्रास उद्भवल्याचे निदर्शनास आले आहे.
बूस्टर डोस द्यायचा असेल तर त्याचा निर्णय देश पातळीवर झाला पाहिजे. कोरोना लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकारने घेतला होता. सीरम इंस्टिट्युटकडे तिसरा बूस्टर डोस उपलब्ध आहे. त्यापूर्वी आधी लोकांना दोन्ही डोस देऊ. यानंतर तिसऱ्या डोसवर विचार करू. पुण्यात 100 टक्के नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. सर्वत्र नागरिकांनी दोन्ही डोस पूर्ण करावे आणि लवकर करावे असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
शाळा सुरू करण्यावर स्थानिक पातळीवर वाद
राज्य सरकारने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय 1 डिसेंबरपासून लागू केला. परंतु, स्थानिक पातळीवर अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप पहिल्या वर्गापसूनच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत. यावर बोलताना, ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या भीतीने स्थानिक पातळीवर शाळा सुरू करण्याबाबत वाद होतात. त्यामुळे, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबतचा निर्णय राज्य सरकारकडून आढावा घेऊन घेण्यात येईल. यापूर्वी सुद्धा त्या-त्या परिस्थितीनुसार शाळा सुरू करणे आणि रद्द करणे असे निर्णय झालेले आहेत असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.