आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'राज्यात गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप आता सत्ताधारी पक्षातील काहीजण करत आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांचे दाखले देत आहेत. मात्र, मी आतापर्यंत सत्तेत असताना कधीही कोणालाही त्रास दिलेला नाही', असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
मविआ सत्तेत असतात मुंबईच्या पोलिस आयुक्तांना मला अडकवण्याचे टार्गेट दिले होते, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यालाच अजित पवारांनी हे प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे.
आज पुण्यात पत्रकारांशी अजित पवारांनी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले, सध्या तपास यंत्रणाकडून राज्यात सुरु असलेल्या वेगवेगळया कारवाया पाहता सुडाचे राजकारण सुरु असल्याचे दिसते. राजकीय द्विेषातून कोणी कोणाला त्रास देऊ नये या मताचा मी आहे. काही सत्ताधारी आता मविआने आम्हाला अडकविण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करतात. मात्र, मी सत्तेत असताना कधीही कोणालाही त्रास दिला नाही. सर्वांना कायदा, संविधान समान आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्याचा विचार करुन पुढे गेले पाहिजे.
अर्थसंकल्प म्हणजे ‘चुनावी जुमला’
अजित पवार म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प पाहून तो ‘चुनावी जुमला’ वाटत आहे. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अधिक भाव दिला असतानाही कारखान्यांना आयकर लावण्यात आला होता. हा कर काढला गेला हे एक शेतकरी म्हणून मला दिलासादायक वाटत आहे. नऊ राज्यांना डोळयासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये निवडणुक असल्याने साडेतीन हजार कोटी रुपये देण्यात आले. शेजारी महाराष्ट्र असून देशात सर्वाधिक कर आपले राज्य देते. त्यामुळे आपल्याला मोठया प्रमाणात केंद्र सरकारने मदत दिली पाहिजे. नागरीकरण बहुतांश प्रमाणात होऊ लागल्याने आवश्यक सुविधा देण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत.
पोलिसांच्या बक्षीस योजनेवर टिका
पुणे पोलिसांनी गुन्हेगारी कमी करण्यासाठी व आरोपींना पकडण्यासाठी बक्षीस योजना सुरु केली आहे. त्यावर अजित पवारांनी टीका केली. अजित पवार म्हणाले, सरकारमध्ये काम करत असताना एखादा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती अजिबात सापडत नसेल तर तो मिळून येत नाही असे आमच्या काळात जाहीर केले जाते. चंदन तस्कर वीरप्पन, चार्ल्स शोभराज सापडत नव्हते. त्यावेळी अशाप्रकारचे बक्षीस पोलिसांसाठी जाहीर करण्यात आले होते. परंतु आता सरसकट गुन्हेगारांची नावे जाहीर करुन बक्षिसांची घोषणा केली तर पोलिस यंत्रणे पुढेच प्रश्नचिन्ह निर्माण होतात.
सरसकट बक्षीस जाहीर करणे योग्य नाही
अजित पवार म्हणाले, कुठे अत्याचार होत असतील तर कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचे काम पोलिसांचे आहे. पोलिसांना सतत बक्षीसांचे प्रलोभन दाखवले तर पोलिस कर्मचारी म्हणतील आम्ही बक्षीस जाहीर केले तरच पुढील काळात काम करु. पोलीसांचे खबरे असतात. त्यांच्याकडून त्यांनी माहिती मिळवली पाहिजे. या निर्णयाबाबत पोलिस अधिकाऱ्यांना मी सुध्दा विचारणा करेल अशाप्रकारे नवे पायंडे का पाडत आहे. पोलिसांना न मिळणाऱ्या गुन्हेगारांबाबत अशाप्रकारे बक्षीस जाहीर करणे ठीक आहे. परंतु सरसकट बक्षीस जाहीर करणे योग्य नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.