आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमची चूक झाली. सत्यजित तांबेंना नाशिक पदवीधर निवडणुकीत उमेदवारी द्यायला हवी होती, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.
शनिवारी रात्री बारामती येथे झालेल्या जाहीर सभेत अजित पवारांनी हे वक्तव्य केले.
सत्यजित तांबेंच्या बाजूने अजित पवार
सत्यजित तांबेंनी कालच पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरच गंभीर आरोप करत सत्यजित तांबे म्हणाले होते की, मला अखेरच्या क्षणी चुकीचा एबी फॉर्म देण्यात आला. तांबे कुटुंब तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची बदनामी करण्यासाठी कट रचण्यात आला. आमच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले.
त्यानंतर बारामती येथे झालेल्या जाहीर सभेत अजित पवारांनी सत्यजित तांबेंना उमेदवारी द्यायला हवी होती, असे वक्तव्य करुन अजित पवारांनी सत्यजित तांबेंची बाजू घेतली आहे.
सत्ताधाऱ्यांविरोधात कल
बारामती येथे जाहीर सभेत शिक्षक-पदवीधर निवडणुकीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, शिकलेल्या पदवीधरांनी आणि राज्यातील शिक्षकांनी कोणाला निवडून दिले हे आपण पाहिलेच आहे. सध्याच्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल हा राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्र फार काळ सहन करत नाही. अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत. मात्र सध्या जो शिकलेला मतदार आहे, त्याने कशा प्रकारचा कौल दिला आहे, हे आपण पाहिले.
तरुणांना संधी दिली पाहीजे
पुढे अजित पवार म्हणाले, आमची जरा चूक झाली. मी त्याचा अगोदरच उल्लेख केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती. वडील काय किंवा मुलगा काय. तरुणांना संधी दिली पाहिजे. तरुण चांगेल काम करत असतील तर त्यांना संधी द्यायला हवी, या मताचा मी आहे. मात्र कोणाला उमेदवारी द्यावी, हा सर्वस्वी काँग्रेसचा अधिकार होता. त्यात मी लुडबूड करण्याचे काही कारण नव्हते. कारण ती जागा काँग्रेसला सुलटलेली होती.
नाना पटोलेंवर निशाणा?
दरम्यान, काल नाना पटोले यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. अजित पवारांनीच तांबे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणला, असे नाना पटोले म्हणाले होते. त्यानंतर अजित पवारांनी सत्यजित तांबेंना उमेदवारी द्यायला हवी होती, असे म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर म्हणजेच नाना पटोलेंवरच निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.