आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार 7 आमदारांसह नॉट रिचेबल आहेत', अशा बातम्या आज सकाळपासून विविध प्रसारमाध्यमांत प्रसारीत झाल्या. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. तसेच, सोशल मीडियावरही अजित पवार चांगलेच चर्चेत होते. अनेकांना पहाटेच्या शपथविधीची पुन्हा आठवण झाली. मात्र, आज सकाळीच पुण्यातील एका कार्यक्रमात सहभागी होत अजित पवारांनी या बातम्यांची हवा काढून टाकली. तसेच, या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले.
औषधे घेऊन झोपलो होतो
आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, मागील काही दिवसांपासून माझे जागरण जास्त झाले. मी दौरेही जास्त केले. त्यामुळे मला पित्ताचा त्रास झाला. त्यासाठी डॉक्टरांकडून गोळ्या घेऊन मी शांतपणे घरी झोपलो. त्यानंतर आज सकाळपासून मी कार्यक्रमांना पुन्हा हजेरी लावली आहे. मात्र, प्रसारमाध्यमे चुकीच्या बातम्या दाखवत आहेत की, अजित पवार नॉट रिचेबल आहे.
किती बदनामी करणार?
'अजित पवार नॉट रिचेबल', या बातम्यांवर संताप व्यक्त करतान अजित पवार म्हणाले की, एखाद्याची बदनामी करायची तर किती करायची. आम्ही लोकनेते असल्यामुळे प्रसार माध्यमे आमच्या बाबत विविध बातम्या देतात. तो त्यांचा अधिकारही आहे. मात्र, निराधार बातम्या देण्यापूर्वी काही खातरजमा तरी करायला पाहीजे की नाही?. धक्कादायक म्हणजे मी सकाळी उठून वृत्तपत्र चाळले तर त्यातही एका विशेष बॉक्समध्ये माझ्याविषयी चुकीच्या बातम्या छापल्या आहेत. प्रसारमाध्यमांनी कारण नसताना माझी बदनामी करू नये.
शरद पवारांची भूमिका पक्षाची भूमिका
दरम्यान, काँग्रेससह विरोधी पक्ष अदानी घोटाळ्यासाठी जेपीसीची मागणी करत असतानाच शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाच्या समिची मागणी करुन वेगळी भूमिका मांडली आहे. यावर अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांची एका हिंदी वृत्तवाहिनीची मुलाखत मी पाहिली आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे, ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी एखादी भूमिका मांडली की ती पक्षाची आणि आमच्या सर्वांची भूमिका असते. त्यावर आम्ही काय बोलणार?
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अद्याप चर्चा नाही
पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर अजित पवार म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीस एक वर्ष राहिलेले आहे. सध्या वेगवेगळया निवडणुका होत असताना निवडणूक आयोगाने अद्याप पुण्यातील लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेतलेला नाही. ज्यावेळी निवडणूक आयोग निर्णय घेईल, तेव्हा विविध पक्ष एकत्र येऊन नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत निर्णय घेण्यात येईल. याबाबत महाविकास आघाडी एकत्रित चर्चा करून निर्णय घेईल.
अजित पवार म्हणाले की,अद्याप लोकसभा पोटनिवडणुकीबाबत आघाडीत चर्चा केली नाही. निवडणूक आयोगाने कोणता निर्णय जाहीर केलेला नाही. त्यांचा निर्णय जाहीर झाल्यानंतरच आम्ही आमची भूमिका मांडू. पुणे लोकसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठीही कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही.
अयोध्या दौऱ्यावरुन टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांसह अयोध्या दौऱ्याला जात आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले, देशात वेगवेगळ्या जाती, पंथ, धर्माचे लोक राहतात. आपला देश सेक्युलर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अयोध्येला दर्शनाला जावे वाटले आणि ते गेले. मीही देवदर्शनाला जात असतो, मात्र प्रसिद्धी करत नसतो. लोकांचे दैनंदिन जीवनाचे प्रश्न महागाई, बेरोजगारी, कोरोना वाढते प्रमाण याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महत्त्वाचे श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार प्रत्येकास आहे. तिरुपती, तुळजापूर, कोल्हापूर, शिर्डी आदी ठिकाणी अनेकजण जातात व दर्शन घेतात. महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचे ते मुख्यमंत्री असून त्यांच्यासोबत अनेक मंत्री आयोध्याला गेले त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळणार असून आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत.
हेही वाचा,
भूमिका:हिंडेनबर्ग कोण माहिती नाही? अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाची समितीच योग्य- शरद पवार
अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली. शरद पवार म्हणाले, जेपीसीमध्ये लोकसभा व राज्यसभेत जो सर्वात मोठा पक्ष आहे, त्याच्याच खासदारांची संख्या अधिक असते. अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी आता जेपीसी बनवलीच तर त्यात भाजपचे 15 खासदार असतील. उर्वरित 6 ते 7 खासदार विरोधी पक्षातील असतील. ज्या जेपीसीत विरोधकांची संख्या एवढी कमी आणि सत्ताधाऱ्यांची संख्या अधिक असेल, अशा समितीच्या निर्णयावर शंका उपस्थित करायला वाव आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.