आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांत खळबळ:IPS कृष्ण प्रकाश यांच्यासाठी 200 कोटी वसुलीचे कथित पत्र व्हायरल, अधिकाऱ्याकडून खंडन

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासाठी जमीन खरेदी विक्री व्यवहारातून 200 कोटी रुपये वसूल केल्याचे एका सहायक पोलिस निरीक्षकाच्या नावाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेले कथित पत्र साेशल मीडियावर व्हायरल झाले. चार सहायक पोलिस आयुक्त, चार वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी या कामात मदत केल्याचाही या पत्रात उल्लेख आहे. त्यामुळे पोलिस दलाविषय उलटसुलट चर्चा सुरू झाली. सहायक पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावे हे पत्र व्हायरल झाले आहे. मात्र, डोगरें यांनी आपण हे पत्र लिहिलेच नसल्याचे स्पष्ट केले.

डोंगरे यांच्या नावाने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात आहे. आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करून त्याचे प्रमुखपद माझ्याकडे सोपविले. जमिनींच्या खरेदी-विक्रीची प्रकरणे मला हाताळण्यास सांगितले. त्यातून येणारे कोट्यवधी रुपये मला स्वीकारण्यास सांगितले. आतापर्यंत कृष्ण प्रकाश यांच्यासाठी गोळा केलेली रक्कम 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. इच्छा नसताना मला ही कामे करावी लागली. या कालावधीत अनेक बांधकाम व्यावसायिक आणि काही महिलांशी संबधित नको ती कामे करावी लागली. मीडियाला कसे पैसे द्यायचे, हे काम चार वरिष्ठ निरीक्षकांना ठरवून करावं लागत होतं. मीडियाला हाताशी धरून सर्वसामान्यांमध्ये साहेबांची प्रतिमा उंचावण्याचे कामही केले.

कृष्ण प्रकाश यांची प्रतिमा उंचावण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर करण्यात आला. हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यापासून माझ्या जिवाला या पत्रानंतर धोका निर्माण होऊ शकतो. लोकप्रतिनिधींना हाताशी धरून केलेले जमिनीचे व्यवहार उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लोकांनी गोळा केलेल्या पैशांच्या व्यवहारात मला गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. प्रत्येक व्यवहाराची फोन रेकॉर्डिंग, माहिती पुराव्यानिशी माझ्याकडे आहे. चार सहायक आयुक्त जमिनीचे प्रकरण पाहून मगच आयुक्तालयात पाठवत. या चारही जणांना शहरातील सर्व व्यवहारांबाबत कल्पना आहे. यातून वरिष्ठ निरीक्षकांना बाजूला ठेवण्यात आले. मॅटमधून बदली रद्द करून आलेल्या निरीक्षकाडून जबरदस्तीने पूर्वीच्या ठिकाणी नियुक्ती नको असे लिहून घेतले होते. परंतु, चार पोलिस निरीक्षक आणि एक सहायक पोलिस निरीक्षक आयुक्तालयात बसून सगळे व्यवहार सांभाळत होते,’ असा मजकूर व्हायरल पत्रात नमूद आहे.

हा सर्व मजकूर खाेटा
^कोणीतरी माझ्या नावाचा गैरवापर करून हे पत्र व्हायरल केले. या पत्रातील मजकूर खोटा असून कृष्ण प्रकाश आणि पोलिस दलाची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. या खोट्या पत्रासंदर्भात योग्य ती कारवाई करावी यासाठी पोलिस आ़युक्तांकडे पत्र दिले आहे. - डॉ. अशोक डोंगरे, सहायक पोलिस निरिक्षक
व्हायरल पत्राची चाैकशी
^व्हायरल पत्राबाबत सहायक पोलिस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांचा अर्ज प्राप्त झाला आहे. त्यानुसार, व्हायरल पत्राची चौकशी करण्यात येणार आहे. अपर पोलिस आयुक्त संजय शिंदे यांना त्या संदर्भातील आदेश देण्यात आले आहेत. - अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

बातम्या आणखी आहेत...