आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोहारी दृश्य:श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात 50 लाख सुवासिक फुलांची आरास

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोगऱ्याच्या सुवासिक फुलांसह गुलाब, लीली, चाफा, झेंडूच्या फुलांची आरास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त करण्यात आली. तब्बल 50 लाख सुवासिक फुलांचा गंध मंदिर परिसरात दरवळत होता. लाडक्या गणपती बाप्पाला फुलांचा महानैवेद्य दाखविल्याचे मनोहारी दृश्य यानिमित्ताने पुणेकरांना अनुभवायला मिळाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले होते. तब्बल 250 महिला व 70 पुरुष कारागीरांनी सलग 3 दिवस पुष्पसजावटीची तयारी केली होती.

गणरायाच्या मूर्तीला शुंडाभूषण, कानवले, मुकुट, अंगरखा यांसह फुलांनी साकारलेली विविध आभूषणे परिधान करण्यात आली होती. गणरायाचे मनोहारी रूप पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली. मोगरा महोत्सवानिमित्त विविधरंगी फुलांनी सजलेले मंदिर पाहण्यासोबतच हे दृश्य मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, वर्षभर शेतकरी मेहनतीने शेतात राबून फुले पिकवितो. आज तीच फुले मंदिरात बाप्पा चरणी अर्पण करण्यात आली. तसेच, बळीराजा सुखात राहू देत, अशी प्रार्थना देखील करण्यात आली.

यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये 700 किलो मोगरा, 30 हजार चाफा, 26 हजार गुलाब, 90 किलो कन्हेर, 300 किलो झेंडू, जाई, जुई, कमळ, 500 किलो गुलछडी, पासली, लिली यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. मोगरा महोत्सवाच्या वेळी वासंतिक उटीचे भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले आहे.