आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव गणरायाचा:पुण्यात 10 लाख उकडीच्या मोदकांची ऑर्डर; 10 कोटींची उलाढाल, 15 हजार महिलांना रोजगार

मंगेश फल्ले | पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उकडीचे मोदक हा अत्यंत कौशल्याचा पदार्थ असल्याने अनेकांचा कल ते रेडिमेड आणण्याकडे वाढतो आहे. त्यामुळेच पुण्यात गणेशोत्सवात उकडीचे मोदक तयार करून विकणे हा मोठा व्यवसाय झाला आहे. गणपती उत्सवाच्या अवघ्या १० दिवसांत एकट्या पुणे शहरात १० लाख उकडीचे मोदक विकले जातात. १५ हजारांहून अधिक महिलांना यातून रोजगार उपलब्ध झाला आहे. सोबतच २ हजारांहून अधिक व्यावसायिकही या मोदक प्रेमातून तयार झाले आहेत. एकट्या पुण्यात मोदक विक्रीतून १० कोटी रुपयांची उलाढाल होते. विशेष म्हणजे, परदेशी भक्तांकडून उकडीच्या फ्रोझन मोदकांना मागणी वाढते आहे.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसात पुणेकराकडून तब्बल दहा लाख उकडीच्या मोदकांची मागणी येत असल्याचे मोदक व्यावसायिकांनी सांगितले आहे. कोकणात प्रामुख्याने मुबलक प्रमाणात तांदूळ आणि नारळ याचे उत्पादन होत असल्याने उकडीचे मोदक हे तेथील पारंपरिक पक्वान्न. तेथे दर महिन्याच्या चतुर्थीला गणरायाला उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून दाखवण्याची ही प्रथा आहे. गूळ, खोबरे, खसखस, जायफळ, इलायची यांचे सारण आणि इंद्रायणी व आंबेमोहर तांदळाची पिठी यापासून उकडीचे मोदक तयार करण्यात येतात.

उकडीचे महत्त्व आणि हातवळणीचे कौशल्य : योग्य प्रमाणात उकड दिली गेली तरच मोदक न तुटता व्यवस्थित बनवता येऊ शकतात. यादरम्यान, मोदकाला हाताने व्यवस्थित पाळ्या पाडणे हेही कलात्मक काम असते. काळानुरूप उकडीच्या मोदकासह मावा मोदक, काजू मोदक, चॉकलेट मोदक, आंबा मोदक अशा वेगवेगळ्या स्वरूपात पर्याय समोर आले आहे. दिवसेंदिवस उकडीच्या मोदकांची मागणी वाढत असली तरी प्रशिक्षित मोदक बनवणाऱ्यांची कमतरता जाणवत असल्याचे व्यवसायिकांचे सांगणे आहे.

बँकेची नोकरी सोडून उतरले मोदकांच्या व्यवसायात

सदाशिव पेठेतील ज्योती गोडबोलेंनी २००६ मध्ये उकडीचे मोदक तयार करून १-२ दुकानदारांकडे विक्रीस ठेवले. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. हा व्यवसाय एवढा वाढला आहे की त्यांच्या पतीने बँकेतील नोकरी सोडून यात मदत सुरू केली आहे. एकट्या कुटुंबाकडे गणेशोत्सवात ५० हजार मोदकांची ऑर्डर आली आहे. त्याशिवाय दर महिन्याच्या चतुर्थीस ५ हजार मोदक विकले जातात. १५ ते १६ महिलांना त्यांनी रोजगार दिला आहे. पती, इंजिनिअर असलेला मुलगा, सुटी घेऊन येणारी मुलगी, सून, जावई असे सर्वजण या काळात मोदक वळतात.

२ लाख फ्रोझन मोदक परदेशी

उकडीचे मोदक हा नाशवंत पदार्थ असल्याने तो तत्काळ संपवणे आवश्यक आहे. मात्र, दूर राहणारे अथवा परदेशात राहणाऱ्याना उकडीचे मोदक पुरवण्याच्या दृष्टीने फ्रोझन मोदक संकल्पना अस्तित्वात आली आहे. मागील एक वर्षापासून पुण्यातून सुमारे दोन लाख फ्रोझन मोदकांची मागणी वाढलेली आहे. दुबई, कतार, लंडन, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका यासारख्या देशांतून फ्रोझन मोदकांची मागणी करण्यात येत आहे. उणे १८ डिग्री सेल्सियस तापमानाला ते ठेवले जातात. वापराआधी दहा मिनिटात वाफेवर अथवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवून ते खाण्यास तयार होतात.

पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार २५ वर्षांपासून उकडीच्या मोदकांचे प्रशिक्षण देतात. त्यातून २ हजार व्यावसायिक तयार झाले असून १० हजार महिलांना रोजगार मिळाला. या काळात मोठे हलवाई, फूड व्यावसायिकांकडेही मोदक वळणाऱ्या महिलांना मोठी मागणी असते. एकट्या पूना गेस्ट हाऊसकडे चतुर्थीला ५० हजार मोदकांची मागणी होती.

बातम्या आणखी आहेत...