आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमूल्य चित्रठेवा:छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रकाशित दुर्मिळ चित्र सापडले, फ्रान्सच्या सॅव्हही कलेक्शनमध्ये चित्र

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रकाशित दुर्मिळ चित्र सापडले

छत्रपती शिवाजी महाराजांचे लघुचित्र परंपरेतील गोवळकोंडा शैलीतील चित्र नुकतेच फ्रान्समधील चित्रसंग्रहात सापडले आहे. इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांच्या संशोधनामुळे हा अमूल्य चित्रठेवा प्रकाशात आला आहे. शिवछत्रपतींचे हे अप्रकाशित चित्र असून सध्या ते फ्रान्स येथे “सॅव्ही कलेक्शन’मध्ये आहे.

प्रसाद तारे म्हणाले, “शिवाजी महाराजांचे हे चित्र सतराव्या शतकात काढले आहे. महाराजांनी जो दक्षिण दिग्विजय केला त्यादरम्यान हे चित्र केले असावे. कारण हे चित्र गोवळकोंडा शैलीतील आहे. हे पूर्णाकृती चित्र दरबारी पोशाखात आहे. महाराजांचे आपादमस्तक दर्शन या लघुचित्रातून घडते. प्रसन्न मुद्रा, शिरोभूषण व तुरा, गळ्यातील अलंकार, शेला, कमरबंध व त्यात खोवलेली कट्यार, मोजड्या, भरजरी तलम अंगरखा व सुरवार यांचे चित्रण यामध्ये आहे.’

फ्रान्समध्ये लुईस चार्ल्स या सरदार घराण्याच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहात हे चित्र होते. या संग्रहाचे सॅव्ही कलेक्शनकडे हस्तांतरण झाले. त्यामुळे हे चित्र त्या संग्रहात आहे. सतराव्या शतकात युरोपियन व्यापारी आणि अन्य लोकांच्या वखारी भारतात होत्याच. त्यापैकी कुणीतरी ही चित्रे केली असावीत. इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे म्हणाले, हे संशोधन मोलाचे आहे. शिवछत्रपतींच्या अन्य उपलब्ध चित्रांशी हे चित्र मिळतेजुळते आहे. इतक्या वर्षांनंतरही हे चित्र उत्तम अवस्थेत आहे, हेही आश्चर्य आहे. ऐतिहासिकदृष्ट्या ही मोठी उपलब्धी आहे.

चित्राची वैशिष्ट्ये अशी
- लघुचित्र परंपरेतील चित्र
- गोवळकोंडा शैलीतील चित्र
- महाराजांचे आपादमस्तक दर्शन
- जलरंगाचा वापर
- सतराव्या शतकातील चित्र
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपलब्ध मूळ चित्रांशी साम्य आहे.

बातम्या आणखी आहेत...