आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा नेत्रदीपक सोहळा सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संकटामुळे झाकोळला आहे. तरीही मानाच्या श्रींसह महत्त्वाची गणेश मंडळे परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करत यंदाही साधेपणाने गणरायाला निरोप देत आहेत. पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे साधेपणाने विसर्जन करण्यात आले.
यंदा प्रथेनुसार महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी दहा वाजता विसर्जन सोहळा सुरू झाला.
मानाच्या पहिल्या कसाब गणपतीचे विसर्जन वेळेनुसार झाले. महामारीच्या संकटामुळे गणपतीचे विसर्जन मंडळाच्या मंडपातच करण्यात आले. गणपतीच्या पालखीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पोलीस सह अतिरिक्त पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांनी उपस्थिती लावली.
औरंगाबाद / यंदाही मिरवणुकीविना बाप्पाला निरोप; 9 विहिरी, एका कृत्रिम तलावात विसर्जन
कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी मिरवणुकीविना गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. रविवारी (१९ सप्टेंबर) नऊ विहिरी, एका कृत्रिम तलावावर विसर्जन होईल. भक्तांनी शक्यतो घरीच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे किंवा मनपाच्या संकलन केंद्रात मूर्ती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. निर्माल्य संकलानासाठीही महानगरपालिकेने व्यवस्था केली आहे.
यावर्षी शहरात १०० पेक्षा अधिक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत, तर तीस हजारांपेक्षा अधिक घरगुती गणपती आहेत. कोरोनामुळे मिरवणुकींना परवानगी नाकारण्यात आली आहे. शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंडळाची गणेशमूर्ती अगदी साध्या पद्धतीने लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विसर्जित होणार आहे, असे गणेश महासंघाकडून सांगण्यात आले.
मनपाकडून व्यवस्था
मनपाने नऊ प्रभागांत मूर्ती संकलनाची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी या केंद्रांवरच मूर्ती जमा कराव्यात. एकत्रित केलेल्या मूर्तींचे विधिवत विसर्जन केले जाईल. मूर्ती संकलन केंद्रांवर कोरोना नियमाचे पालन करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
असा पोलिसांचा बंदोबस्त
पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्तांच्या नेतृत्वात तीन पोलिस उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त, २८ पोलिस निरीक्षक, ८३ उपनिरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षक, ११०७ पुरुष पोलिस कर्मचारी आणि १७१ महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी असतील.
नाशिक / गणेश विसर्जनासाठी २७ नैसर्गिक तर ४३ कृत्रिम तलाव
कोरोनाचे संकट दूर होऊन सर्वाना आरोग्यदायी जीवन लाभावे हीच प्रार्थना करत रविवारी (दि. १९) अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पांना जड अंतकरणाने निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जनासाठी प्रशासनाच्या वतीने कृत्रिम तलाव उभारले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमांचे पालन करत गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालिकेने गोदावरीसह अन्य उपनद्यांच्या तीरावर विर्सजनासाठी २७ नैसर्गिक स्थळांची यादी जाहीर केली आहे. या व्यतिरिक्त ४३ ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध आहे. या सर्व विसर्जन स्थळांवर स्वयंसेवी, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मूर्ती व निर्माल्य संकलन केले जाईल. ऑनलाइन टाइम स्लॉट बुक करून विसर्जन स्थळी येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. पीओपी मूर्तींचे घरी विसर्जन व विघटन होण्यासाठी पालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांमार्फत अमोनियम कार्बोनेट पावडरचे वाटप केले आहे. ५० किंवा त्यापेक्षा जास्त फ्लॅट्स असणाऱ्या अपार्टमेंट करता फिरता विसर्जन टंॅक देण्यात येईल.
नगर / शहरात 19 विसर्जन कुंड, विशाल गणपतीची उत्थापन पूजा सकाळी ९ वाजता
कोरोनाचे विघ्न असतानाही घरोघरी लाडक्या बाप्पाचे थाटात आगमन झाले होते. दहा दिवस भक्तीरसात न्हाऊन लाडके गणराज आज भक्तांचा निरोप घेणार आहेत. पुढच्या वर्षी लवकर या, हे वचन घेऊनच गणेश भक्त बाप्पाला निरोप देतील. ग्रामदैवत विशाल गणपतीची उत्थापन पूजा आज सकाळी नऊ वाजता होणार आहे. महानगरपालिकेने विसर्जनासाठी १९ जलकुंभावर विसर्जनाची व्यवस्था केली. तसेच पोलिस बंदबोस्तही तैनात ठेवण्यात आला.
सोलापूर / वाद्यांविना उत्सव पालिकेचे ७०० कर्मचारी कार्यरत; स्वच्छता अन् पावित्र्याची घेताहेत काळजी
आनंदाची उधळण करत आलेल्या लाडक्या गणरायाला रविवारी शांततेत निरोप देण्याची तयारी भक्तांनी केली आहे. कोरोना नियमांमुळे वाजत-गाजत अन् गुलाल उधळत किंवा लेझीमच्या तालात विसर्जन मिरवणुका निघणार नाहीत. शांततेत महापालिकेने उभारलेल्या संकलन केंद्रांवर मूर्ती सुपूर्द केल्यानंतर त्या मूर्तींचे पावित्र्य जपत विसर्जन करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. महापालिकेचे ३०० आणि इतर ४०० असे एकूण ७०० कर्मचारी महापालिकेने यासाठी कार्यरत केले असून, ते दिवसभर भाविकांच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहेत.
प्रत्येक संकलन केंद्राच्या ठिकाणी स्वच्छता आणि पावित्र्य राहील, याची काळजी घेण्यात येत आहे. प्रत्येक झोनद्वारे अधिकारी आणि कर्मचारी असे १५ सदस्यांची चमू कर्तव्य बजावणार आहे. विसर्जन स्थळी गर्दी होऊ नये, काेराेनाच्या नियमांची पायमल्ली हाेऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व भक्तांना घरच्या घरी गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सर्व मध्यवर्ती गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शहरवासीयांनीही शक्य असेल त्यांनी घरी विसर्जन करावे अथवा संकलन केंद्रावर मूर्ती द्यावी. महापालिकेच्या वतीने सर्व धार्मिक विधी करून विसर्जन केले जाईल, असा विश्वास महापालिकेने दिला आहे.
जळगाव / शहरात २८ ठिकाणी मूर्ती अर्पण केेंद्र, मेहरूण तलावावर तयारी पूर्ण
मनपा आणि पाेलिस प्रशासन रविवारच्या गणेश विसर्जनासाठी सज्ज झाले आहे. मेहरूण तलाव वगळता अन्य ठिकाणी विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येकाला तलावापर्यंत पाेहाेचणे शक्य नसल्याने संकलन केंद्रांवर गणपती मूर्ती अर्पण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
गिरणा काठावर निमखेडी शिवार व गिरणा पंपिंग येथे धाेकादायक स्थिती निर्माण झाल्याने तेथे विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. मेहरूण तलावावर घरगुती तसेच चार फुटापेक्षा लहान मूर्ती विसर्जनासाठी गणेश घाटावर व्यवस्था केली आहे. चार फुटाच्या मूर्तीचे विसर्जन सेंट टेरेसा शाळेच्या बाजूने तलावावर केले जाणार आहे. रामेश्वर काॅलनीकडून गणेश विसर्जनाला बंदी घालण्यात आली असून, पाेलिस बंदाेबस्त तैनात असेल.
बीड / मिरवणुकांना परवानगी नाही, पोलिस बंदोबस्त तैनात
जिल्ह्यात रविवारी (दि.१९) लाडक्या विघ्नहर्त्याला निरोप दिला जात आहे. काेराेनामुळे जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला काेराेनामुळे बंदी घातलेली असून विसर्जन बंदोबस्तासाठी इतर जिल्ह्यांतूनही वाढीव पोलिस मनुष्यबळ मागवले आहे.
बीड शहरात गणेश विसर्जनासाठी कनकालेश्वर मंदिर परिसरातील विहीर व खंडेश्वरी मंदिर परिसरातील बारव या दोन ठिकाणी घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. तसेच शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाची विशेष व्यवस्था केली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या प्रमुखांना पोलिसांच्या नियोजनानुसार ट्रॅक्टरच्या माध्यमातून गणेशमूर्ती देणे बंधनकारक आहे. सार्वजनिक गणपतीचे विसर्जन हे प्रशासनाकडून केले जाणार आहे. त्यासाठी नगरपालिकेने शहरातील तीन पाेलिस ठाण्यांच्या ताब्यात प्रत्येकी दाेन अशा एकूण सहा ट्रॅक्टरची व्यवस्था केली.
अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा : गणेश विसर्जनासाठी जिल्ह्यात तगडा बंदोबस्त तैनात केला. जिल्ह्यांतर्गत २ अपर पोलिस अधीक्षक, ५ पोलिस उपअधीक्षक, २३ पोलिस निरीक्षक, ६० सहायक पोलिस निरीक्षक, ८५ पोलिस उपनिरीक्षक व पोलिस ठाण्यांचे दोन हजार कर्मचारी असा बंदोबस्त तैनात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.