धाकधूक वाढली : पुण्यात अंगणवाडी सेविका महिलेला कोरोना लागण, २८ गावांची तपासणी 

 • 87 जण हाेम क्वाॅरंटाइन, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

दिव्य मराठी वेब टीम

Mar 24,2020 09:00:00 AM IST

पुणे : जिल्ह्यातील वरसगाव (ता.वेल्हे) गोरडवाडी येथील ४१ वर्षीय अंगणवाडी सेविकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित महिलेला स्थानिक संसर्ग झाल्याची भीती व्यक्त होत आहे. रविवारी तिच्या संपर्कातील चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सदर अंगणवाडी सेविका वेल्हा तालुक्यातील पानशेत परिसरातील पानशेत, वरसगाव, पुरण बुद्रुक, वडाळवाडी, गाेरडवाडी, सार्इव, मांजरी अशा विविध गावांत गेली असल्याने अनेक गावांत काेराेना बाधित रुग्ण सापडण्याची शक्यता वाढली अाहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून २८ बाधित गावांच्या सीमेवर वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात अाली असून सदर गावांमधील प्रत्येक घराचे सर्वेक्षण सुरू करण्यात अाले अाहे. सदर गावांमध्ये काेराेनाची लक्षणे दिसून अाल्याने ८७ जणांना हाेम क्वारंटाइन (विलगीकरण) करण्यात अाल्याची माहिती जिल्हा अाराेग्य अधिकारी भगवान पवार यांनी दिली अाहे.


विलगीकरण करण्यात अालेल्या संबंधित व्यक्तींमध्ये फ्लू, सर्दी, खाेकला, तापाची साैम्य लक्षणे दिसून अाल्याने त्यांना रहत्या घरात इतरांपासून स्वतंत्र राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला असून त्यांची प्रकृती स्थिर अाहे. सदर गावांमध्ये इतर ठिकाणच्या नागरिकांना जाण्यास प्रशासनाने प्रतिबंध केला असून गावातून बाहेर येण्या-जाण्याच्या मार्गावर वैद्यकीय पथके तपासणीसाठी तैनात करण्यात अाली अाहेत. महिलेच्या संर्पकात अालेल्या व्यक्ती नेमक्या काेणकाेण अाहेत हे समजू शकत नसल्याने प्रशासनासमाेर अडचण निर्माण झाली अाहे. त्यामुळे सदर गावांमधील ५०० ते ६०० कुटुंबांतील अडीच ते ३ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात येत अाहे. साेमवारी सकाळी पीएमअारडीच्या अग्निशामक दलाच्या जवांनानी मारुंजी ग्रामपंचायत, बावधनचा ग्रामीण भाग, काेल्हेवाडी, किरकटवाडी तसेच खडकवासला भागात निर्जंतुकीकरण फवारणी करत घरे निर्जंतुक ठेवण्याचा सल्ला नागरिकांना दिला. सदर महिला पुण्यात राहाण्यास असून ती पानशेतला बस, एसटी अथवा शेअरिंग जीपने गेली असल्याने अनेकांना काेराेनाची बाधा झाल्याचा धाेका अाहे. कात्रज परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील आणखी चौघांना कोरोनाची बाधा झाली आहे. चार रुग्णांना स्थानिक संसर्ग झाल्याने आता स्थानिक संसर्ग सुरू झाला असल्याचे यातून समोर आले आहे. दिल्लीतील डाॅक्टरांचे एका पथकाने येऊन ही संबंधित महिलेची तपासणी केली अाहे.

परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली ४१ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिला २० मार्च राेजी आढळून आली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून तिला न्युमोेनिया देखील झाला आहे. ही महिला मार्चच्या पंधरवड्यात मुंबईतील वाशी येथे विवाह समारंभासाठी गेली होती. तिने मुंबईतील वाशी ते पुण्याजवळील वेल्हे तालुक्यातील वरसगाव येथे प्रवास केल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


कोरोना संसर्ग झालेल्या महिलेने केलेला प्रवास

 • ३ मार्च : पतीसह टॅक्सीने सिंहगड रोडवरून वाशी येथे लग्नाला गेली. तिथे सुमारे दीड हजार वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते.
 • ४ मार्च: तिथून दोघेही त्याच टॅक्सीने पुण्यात परतले. संबंधित टॅक्सी चालकाने ३ मार्चपूर्वी कोणत्याही परदेशातून आलेल्या प्रवाशासाेबत टॅक्सीत प्रवास केला नव्हता.
 • ६ मार्च : वेल्हे येथील पंचायत समितीमध्ये मीटिंगसाठी गेली. तिथे मीटिंगमध्ये उपस्थित असणाऱ्या अंगणवाडी सेविका, शिक्षक व तसेच इतरांशी संपर्क झाला.
 • ७ मार्च : ती महिला घरीच होती. तिला कोणतीही लक्षणे नव्हती.
 • ८ मार्च : खोकल्याचा त्रास जाणवू लागला पण दिवसभर घरीच.
 • ९ मार्च : ताप आल्याने जवळच्या पानशेत येथील क्लिनिकमध्ये जाऊन औषधे घेतली.
 • १०- ११ मार्च : खोकल्यामध्ये वाढ झाली.
 • १२-१३ मार्च : खोकला असूनही ती पानशेत परिसरात एका जीपने गेली. तिथून वरसगाव येथील गोरडवाडीतील काही जणांना भेटली. यानंतर दुसऱ्या दिवशीही जीपने वरसगाव गाठले, तर येताना ती एसटी बसने आली.
 • १६ मार्च : १३ ते १४ मार्चला त्रास वाढल्यामुळे भारतीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे एक्स-रे काढल्यानंतर त्यात निमोनिया असल्याचे निदान झाले. त्यामुळे स्वाइन फ्लूची शक्यता गृहीत धरून तिचे नमुने “एनआयव्ही’ मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले. या तपासणीत तिला स्वाइन फ्लू नाहीतर कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
 • २१ मार्च : वरसगाव येथील गोरडवाडी येथे वेल्हे तालुका प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांनी संपूर्ण गावात पाहणी करून संबंधित महिलेच्या संपर्कात आलेल्या १० ते १५ जणांची तपासणी करून हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारले असून घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे इतर गावांमध्ये तपासणी सुरू केली अाहे.
 • २२ मार्च : महिलेच्या संपर्कात अालेल्या ४ व्यक्ती काेराेना पाॅझिटिव्ह. दोन दिवसांत महिलेच्या संपर्कात अालेले ८७ जण हाेम क्वारंटाइन केले.
X