आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शेतकरी आंदोलनासंदर्भात प्रत्यक्ष आंदोलनाला झळ पोहोचेल किंवा धक्का बसेल असा कुठलाही निर्णय अण्णा कधीच घेणार नाहीत, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक मेधा पाटकर यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात उपोषण करण्याचा निर्णय स्थगित केल्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मेधाताई बोलत होत्या. केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, ही मोदी सरकारची परीक्षाच ठरेल, असे सांगून त्या म्हणाल्या, हमी भाव कायद्याचे काय, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींचे काय, नव्या कृषी कायद्याच्या स्थगितीनंतरची भूमिका कोणती? असे अनेक महत्त्वाचे प्रश्न सर्वांच्या मनात आहेत. देशातील ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, अशा राज्यांनी या नव्या कृषी विधेयकाला स्थगिती दिली आहे. आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा याबाबतचा निर्णय काय, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
शेतकरी आंदोलनादरम्यान १७० शेतकरी शहीद झाले आहेत. त्यात महाराष्ट्रातील एका महिलेचा समावेश आहे. आजही दिवसरात्र शेतकरी तिथे बसून आहेत. कृषी विधेयक मागे घ्यावे, ही मागणी आहे. ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान जे घडले, त्या गोष्टी यथावकाश सर्वांसमोर येतील,मोदीजी मात्र गप्प आहेत, अशी टीका पाटकर यांनी केली.
आंदोलन सुरूच राहील
कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे आणि ते सुरूच राहील. सीमा बंद करून बळाचा वापर करून कित्येक शेतकऱ्यांना राजधानीच्या सीमांवर रोखण्यात आले आहे. सुरुवातीला आंदोलनासाठी रामलीला मैदान दिले, असे सांगून आयत्या वेळी परवानगी नाकारून, सरकारने आंदोलकांची फसवणूक केली आहे, असा आरोपही पाटकर यांनी केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.