आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणात अटक केलेल्या संशयित खुन्यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले आहे. दाभोळकरांच्या खुन प्रकरणात औरंगाबादचा सचिन अंदुरे आणि दौलताबात भागातील शरद कळसकर हे दोघे संशयित आरोपी आहेत. त्यांना या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले आहे.
अंदुरे आणि कळसकर या दोघांनी दुचाकीवरून येत दाभोळकरांवर गोळीबार केला आणि ते पळून गेल्याचे या साक्षीदाराने सांगितले.
याबाबतचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या पुलावर सकाळी हत्या झाली होती. गोळ्या घालून दोन मारेकरी दुचाकीवरून पसार झाले होते. पुलावर साफ सफार्इ करणारा एक पुरुष आणि महिला पुलाच्या दुभाजकावर बसले होते. त्यावेळी तेथील एका झाडाकडे साक्षीदार तिकडे पाहत असतानाच दोघे दुचाकीवरून आले व त्यांनी एका व्यक्तीला गोळ्या झाडल्या. त्यानंतर ती व्यक्ती काही क्षणात खाली पडली. तेथून हल्लेखोर जवळच असलेल्या पोलिस चौकीच्या बाजूला पळाले. त्यानंतर दुचाकीवरून पसार झाले.
या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या, व्यक्तीला पाहिले. त्यानंतर आम्ही आमच्या कामासाठी निघून गेलो असे त्यांनी सांगितले होते. अंदुरे आणि कळसकर यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे साक्षीदाराने न्यायालयामध्ये सांगितले आहे.
हत्येवेळी नेमके काय झाले?
शरद कळसकर, सचिन अंदुरे यांनी पहाटे पुण्यातील ओंकारेश्वर पूल गाठल्यानंतर पायी जाणारे काही गृहस्थ त्यांना दिसले; परंतु त्यातील नेमके दाभोलकर कोणते, याचा अंदाज शरदला आला नव्हता. त्यामुळे तो काही वेळ बिचकला होता. त्याची चलबिचल सुरू असतानाच एकाने डॉ. दाभोलकर यांचे नाव उच्चारून नमस्कार घातला अन् तेथेच त्यांचे "लक्ष्य' निश्चित झाले. यानंतर दोघांकडून डॉ. दाभोलकर यांच्यावर धाडधाड गोळ्या झाडण्यात आल्या, अशी तपास यंत्रणेकडून ही माहिती देण्यात आली होती.
पुण्यातील 20 ऑगस्ट 2013 ला ओंकारेश्वर पुलावरून नेहमीप्रमाणे फिरण्यास डॉ. नरेंद्र दाभोलकर निघाले होते. तर इकडे सचिन अंदुरे औरंगाबादहून बसने पुण्यात पहाटे सहादरम्यान पोचला. तेथेच त्याला शरद भेटला. त्या वेळी त्यांनी ट्रॅकसूट घातलेला होता. या हत्येशी संबंधित इतर दोघांनी दुचाकी व अन्य साहित्य पुरविण्याचे काम केले. त्यांच्या पहाटेच्या लोकेशनबाबत पूर्वकल्पना मारेकऱ्यांना देण्यात आली होती. जेव्हा शरद व सचिन ओंकारेश्वर पुलाजवळ आले त्या वेळी शरद हा डॉ. दाभोलकरांवर "नजर' ठेवून होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.