आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गर्दी टाळण्यासाठी अॅप, ग्राहकाला मिळते वेळ, पुण्यातील दोन तरुणांचा उपक्रम

पुणे2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक
  • दुकानदारांसह नागरिकांना मिळत आहे फायदा

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात सर्वत्र पसरलेला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु, लाॅकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच नागरिकांची ठिकठिकाणी गर्दी हाेऊ लागल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील दाेन तरुणांनी बनविलेल्या क्यू मॅनेजमेंट सिस्टिममुळे किराणा दुकान, माॅल, डाॅक्टर, बँक अशा वेगवेगळ्या ठिकाणची ग्राहकाला निश्चित वेळ उपलब्ध हाेत आहे. यामुळे एखाद्या ठिकाणी तासन््तास रांगेत उभे राहून प्रतीक्षा करण्याची अथवा वेळेचा अपव्यय टाळण्याचा फायदा नागरिकांना मिळत आहे. यासाेबतच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही होत आहे.

अक्षय पुरी आणि संताेष पाटीदार अशी स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुणांची नावे असून मध्य प्रदेशातील इंदूर येथून त्यांनी काॅम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली आहे. आयबीएम, झेन्सार, विप्राे, यूएस बँक आदी नामांकित कंपन्यांत अक्षय पुरी याने काम केले असून परदेशातील चांगल्या पगाराची नाेकरी साेडून देत त्यांनी पुण्यात येऊन काही तरी वेगळे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. वेगवेगळ्या कल्पनांवर ते विचार विनिमय करत असतानाच त्यांना सलून, डाॅक्टर यांच्याकडे मोठ्या रांगा दिसून आल्या. त्यामुळे सदर रांगा कमी करण्यासाठी काय करता येऊ शकेल, यादृष्टीने त्यांनी साॅफ्टवेअरच्या मदतीने ‘डीआयएनजीजी’ हे अॅप विकसित केले. तंत्रज्ञनाच्या मदतीने ठिकठिकाणच्या रांगेत ताटकळत असलेल्या नागरिकांचा वेळ वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. जर एखाद्या व्यक्तीला डाॅक्टर, वकील, दुकान याठिकाणची वेळ घ्यायची असेल तर त्यांना त्यांच्या सोयीनुसार वेळ उपलब्ध हाेऊ शकते. त्यामुळे ग्राहकाला त्याचा वेळ रांगेत थांबण्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणी चांगल्याप्रकारे वापरता येऊ शकताे.

आरोग्य सेतू अॅपमुळे ग्राहकांची माहिती मिळते

अक्षय पुरी म्हणाला, लाॅकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने दुकानदारांसह ग्राहक घरीच हाेते. दुकानात जाणे ग्राहकांना अवघड असल्याने आणि दुकानदारांना त्यांच्या दुकानातील उत्पादन, वस्तू नागरिकांपर्यंत पोहोचवणे, डेमाे दाखविण्यासाठी तसेच आॅनलाइन आॅर्डर ही यंत्रणा प्रभावी ठरली आणि त्यादृष्टीने सदर अॅपमध्ये बदल करण्यात आले. आराेग्यसेतू अॅपशी ते जाेडल्याने ग्राहकांच्या आराेग्य स्थितीबाबतची माहिती ही सहजरीत्या उपलब्ध हाेऊ लागली आहे. देशभरातील वेगवेगळ्या शहरात ही व्यवस्था सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही त्याने दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. दरम्यान, या अॅपची अनेकांना फायदा होत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे अॅपचा वापर भविष्यात वाढणार आहे.

डॉक्टरांना मिळेल रुग्णांची माहिती

रुग्णालय, क्लिनिक या ठिकाणी डाॅक्टरांना या अॅपच्या माध्यमातून रुग्णाच्या आजाराची पूर्वीची माहिती, प्रिस्क्रिप्शन याची माहिती लगेच उपलब्ध हाेऊ शकते. यासाेबतच बिलिंगही याद्वारे करून आॅनलाइन भरता येऊ शकते. एखाद्या ठिकाणी नेमकी किती रांग आहे आणि आपला क्रमांक कधी येईल याबाबतची माहितीही त्वरित मिळू शकते. सध्याच्या काळात दैनंदिन जीवनावश्यक दुकानात गर्दीचे नियाेजन करणे आणि साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे महत्त्वपूर्ण बनले आहे. एखादी अपाॅइंटमेंट घेणे, रांगेचे व्यवस्थापन करणे आणि टाेकन व्यवस्था यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग अशा प्रकारे प्रभावशाली ठरत आहे.

बातम्या आणखी आहेत...