आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअष्टविनायक विकास आराखडा आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील स्मारक व वढू बुद्रुक येथील समाधी स्थळाच्या विकास आराखड्याला रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन पुणे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 33 कोटी 57 लक्ष रुपयांच्या अष्टविनाय विकास आराखड्यास आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील स्मारक आणि वढू बुद्रुक येथील समाधीस्थळाच्या 269 कोटी 34 लक्ष रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली.
बैठकीस राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, सामाजिक उत्तरदायित्व निधी, जिल्हा परिषद आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून 26 कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व तालुक्यात आवश्यक तेथे अंगणवाडी बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्यात येत आहेत. रस्ते विकासालाही गती देण्यात येणार आहे.
अष्टविनायक विकासासाठी अंदाजपत्रकात 25 कोटी तरतूद करण्यात आले असून पुरवणी मागण्यातही अधिक निधी देण्यात येईल. परिसर विकास करताना मंदिराचे मूळ स्वरूप आणि सौंदर्य कायम राहावे याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. सर्व कामे मंदिर व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याने त्यांनी यासाठी सहकार्य करावे.
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काम सुंदर आणि भव्य होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. स्मारक आणि समधीस्थळाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता वाहनतळाचे योग्य नियोजन करावे, लोकप्रतिनिधींनी याबाबत सूचना केल्यास त्यांचाही अंतर्भाव करण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी गतवर्षी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत झालेला खर्च, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकास आराखड्याबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची आणि अष्टविनायक परिसर विकास आराखड्याची माहिती दिली.2021-22 या वर्षात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत 100 टक्के , अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 99.69 आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत 99.92 टक्के खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
-----
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.