आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आषाढीवारी:पुरातत्वचे अधिकारी सोवळे नेसून करताय विठ्ठल मूर्तीला वज्रलेप, विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची केली स्वच्छता

पंढरपूर ( महेश भंडारकवठेकर)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौथ्यांदा केली जात आहे वज्रलेप प्रक्रिया, नियमित महापुजेमुळे मूर्तीची झाली झीज

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची झीज झाल्यामुळे दोन्ही मूर्तीवर वज्रलेप करण्यात येत आहे. मंगळवारी मुर्ती स्वच्छ केल्या. प्रत्यक्ष वज्रलेपाचे काम बुधवारी केले जाईल अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार ही रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा व सहकाऱ्यांनी सोवळे नेसून विठ्ठलाच्या मूर्तीची सुक्ष्म पाहणी केली. त्यानंतर मूर्तीच्या स्वच्छतेचे काम त्यांनी सुरु केलेले आहे. दर पाच वर्षांनंतर हा लेप झिजल्यावर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पुन्हा ही प्रक्रिया राबवावी लागते. मूर्ती अतिशय पुरातन असल्याने पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार आम्हाला काम करणे बंधनकारक आहे. वज्रलेप प्रक्रियेचे सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

विठ्ठलाची मूर्ती वालुकाश्माची असून १२व्या शतकापूर्वीची आहे. उंची ३ ते साडेतीन फुट आहे. मूर्तीस नैसर्गिकरित्या खोलगट भाग आहेत. मूर्तीचा वर्ण अल्पसा करडा आहे.

चौथ्यांदा केली जात आहे वज्रलेप प्रक्रिया : श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत असल्याचे लक्षात येताच मंदिर समितीने पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांकडून सन १९८८ मध्ये श्री विठ्ठल मूर्तीवर पहिल्यांदा वज्रलेप करुन घेण्यात आला होता. त्यानंतर २००५ मध्ये पुन्हा मूर्तीवर सिलीकाॅन लेप देण्यात आला. २०१२ मध्ये औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाकडून तिसऱ्यांदा वँकर बीएस २९० रसायन वापरुन लेप प्रक्रिया करण्यात आली होती. आता पुन्हा चौथ्यांदा वज्रलेप प्रक्रिया राबवली जात आहे.

नियमित महापुजेमुळे मूर्तीची झाली झीज
विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीस पूर्वी दिवसातून अनेक वेळा दही, दुध, मध, साखर वापरुन अभिषेक केला जात असे. त्यामुळे मूर्तींची झीज होत होती. पुरातत्व विभागाच्या सुचने नुसार सुमारे आठ वर्षापूर्वी महापूजा बंद करण्यात आल्या. त्यानंतर मंदिर समितीच्यावतीने फक्त पहाटेची नित्यपुजाच केली जाते. विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्शामुळे पायांची झीज झाली आहे.

वारकरी पाईक संघटनेने दर्शविला विरोध
वज्रलेप प्रक्रियेस वारकरी पाईक संघटनेने विरोध दर्शविला आहे. रासायनिक द्रव वापरुन वज्रलेप करण्याऐवजी आयुर्वेदात अनेक पद्धती आहेत त्याचा वापर करून मूर्ती संवर्धन करावे अशी मागणी वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी मंदिर समिती प्रशासनाकडे केली आहे. मंदिर प्रशासनाने एक समिती गठित करावी त्या माध्यमातून आयुर्वेदाप्रमाणे लेपाची मागणी वीर महाराजांनी केली.

बातम्या आणखी आहेत...