आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधव याच्या संपर्कातील ४ ते ५ जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य असल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून पोलिसांनी तब्बल १३ पिस्तूल जप्त केले आहेत. मध्य प्रदेशमधून हे पिस्तूल आणल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
संतोषकडूनच मिळाली माहिती
मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आणि ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष जाधव याला पुणे ग्रामीण पोलिसांनी १२ जून रोजी गुजरातमधील भूज जिल्ह्यातील मांडवी येथून अटक केली. तिथे त्याला आश्रय देणाऱ्या नवनाथ सूर्यवंशीच्या मुसक्याही पोलिसांनी आवळल्या. त्यानंतर पोलिस कोठडीत जाधव याची चौकशी करत असताना त्याच्या संपर्कातील आणखी चार ते पाच जणांची माहिती पोलिसांना मिळाली होती. हे सर्व आरोपी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. कारवाईत त्यांच्याकडे 13 पिस्तूल आढळले.
20 जूनपर्यंत कोठडी
संतोष जाधव, सौरभ महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे आणि नवनाथ सुर्यवंशी यांचे बिश्नोई टोळीशी थेट संबंध आहेत. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण, तसेच अभिनेता सलमान खानला धमकी दिल्याच्या प्रकरणात त्यांचा थेट सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपी संतोष जाधव आणि नवनाथ सुर्यवंशी यांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावलेली आहे. याबाबत अधिक तपास पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी मितेश घट्टे, पोलिस उपअधीक्षक सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक अशोक शेळके, सह्यायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे आदी करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.