आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, या उक्तीची प्रचिती देणारा भक्तिमय स्वागत सोहळा लक्षावधी भाविकांच्या साक्षीने बुधवारी पुण्यात साकारला. श्रीक्षेत्र देहू येथून जगद्गुरू तुकाराम महाराज आणि श्रीक्षेत्र आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे बुधवारी सायंकाळी उशिरा पुण्यात आगमन झाले. माउलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान काल झाले होते. मंगळवारी रात्री आळंदी येथील आजोळघरी माउलींच्या सोहळ्याचा मुक्काम होता. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास माउलींच्या पालखी सोहळ्याचे पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. त्याच वेळी आकुर्डी येथे विसावलेला तुकोबांचा पालखी सोहळादेखील पुण्याच्या दिशेने निघाला. बुधवारी सायंकाळी पुणे मुंबई रस्त्यावरून संचेती चौका नजीक दोन्ही पालखी सोहळ्यांची हृद्य भेट झाली आणि लक्षावधी भाविकांच्या मुखातून ‘जय जय राम कृष्ण हरी’ असा जयघोष उमटला. रस्त्यावर दुतर्फा पुणेकर भाविकांची प्रचंड गर्दी होती. ‘माउली माउली ‘असा गजर सुरू होता.
माउलींचा पालखी सोहळा भवानी पेठेतील मंदिरात तर तुकोबांचा पालखी सोहळा निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी विसावला. आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच आमदार व नगरसेवक यांनी सोहळ्याचे औपचारिक स्वागत केले. शुक्रवारी सकाळी दोन्ही पालख्या हडपसरपर्यंत सोबत प्रवास करतील. माउलींच्या पालखी सोहळ्याची वाटचाल दिवे घाटातून सासवडपर्यंत होईल तर तुकोबांचा पालखी सोहळा सोलापूर रस्त्याने पुढे जाईल.
येत्या दोन दिवस पालखी सोहळा पुणे मुक्कामी पुण्यात दोन्ही पालख्यांचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.