आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंगने अनेक गावांमध्ये जाऊन तिथला दुष्काळ दूर केला, शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवले. शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी पुसून त्याच्या शेतीला पाणी मिळवून देण्याचे हे अतुलनीय कार्य आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. कोथरूड येथे आयोजित भक्ती उत्सव-महासत्संग कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, गुरुदेव श्री श्री रविशंकर, आमदार भीमराव तापकीर, शहाजी बापू पाटील, उद्योजक अनिरुद्ध देशपांडे, सूर्यकांत काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विशाल गोखले आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून अनेक लोकांचे जीवन सुधारत असताना सामाजिक दायित्वही गुरुदेवांनी आपल्याला शिकवले. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे आणि महाराष्ट्रातील १७ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी केले. जलयुक्त शिवार योजनेच्या कामात चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग अग्रेसर होती. विज्ञानासह अध्यात्म हा श्री श्री रविशंकर यांच्या विचारांचा गाभा आहे. या विचारांमुळेच जगाच्या पाठीवर अस्तित्वात असलेली अत्यंत प्राचीन सभ्यता म्हणून भारताकडे पाहिले जाते. अथर्वशीर्ष पठणाचा विक्रम पुण्यातच होऊ शकतो, असेही फडणवीस म्हणाले. श्री श्री रविशंकर म्हणाले, पुणे शहरात आणि महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीचा सोहळा साजरा होतो. तीक्ष्ण बुद्धी आणि कोमल भाव ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान आवश्यक असल्याचे जगातील सर्व देशांनी मान्य केले आहे. आयुर्वेद, योग, ध्यान, आध्यात्मिक ज्ञान ही भारताची श्रेष्ठ संपत्ती आहे, असे त्यांनी सांगितले.
गुरुदेव भारतीय संस्कृतीचे संदेशवाहक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी संपूर्ण भारतात आणि जगातील अनेक देशांत भारतीय संस्कृती आणि भारतीय अध्यात्म लोकांमध्ये जागृत केले आणि त्यांच्या रूपाने भारतीय संस्कृतीचे संदेशवाहक पाहायला मिळाले. जागतिक शांती परिषदेच्या माध्यमातून जगातल्या सर्व धर्मांना एकत्र करण्याचे कार्य गुरुदेवांनी केले. हे करत असताना भारतीय विचारांचे श्रेष्ठत्व स्वामी विवेकानंद यांच्यानंतर जगाला पटवून देण्याचे कार्य गुरुदेवांनी केले, असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.