आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजीनाट्य:दिलेला शब्द पाळलाय, 12 आमदारांच्या यादीत राजू शेट्टींचे नाव आहे, राज्यपाल नियुक्त यादीवरून राष्ट्रवादी अध्यक्षांचे प्रथमच स्पष्टीकरण

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमदारकीचा मुद्दा गौण, शरद पवारांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बोलावे : राजू शेट्टी

राज्य सरकारने विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांसाठी नावांची यादी दिली आहे. त्यामध्ये शेती व सहकार क्षेत्रात काम केलेल्यांना घ्यावे असे सुचवले आहे. या यादीत राजू शेट्टी यांचे नाव आहे. त्यावर राज्यपालांकडून निर्णय झालेला नाही, परंतु मी दिलेला शब्द पाळला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींनी काय करावे हा त्यांचा निर्णय आहे, असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले. दरम्यान, आमदारकीचा मुद्दा गौण असून पूरग्रस्तांना मदत देणार की नाही यावर बोलावे, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. विधान परिषदेची आमदारकी हुकणार असे जवळपास निश्चित झाल्याने राष्ट्रवादीने दिलेला शब्द पाळला नाही, असे विधान राजू शेट्टी यांनी केले होते. त्यावर शरद पवारांनी प्रथमच भाष्य केले आहे. पुण्यात शनिवारी कर्वेनगर येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

या वेळी राजू शेट्टी यांचे नाव यादीतून वगळल्याची चर्चा असून यावर शेट्टी जाहीर नाराजी व्यक्त करत आहेत. याबाबत शरद पवार म्हणाले, राजू शेट्टी नाराज आहेत की नाही माहीत नाही. कृषी आणि सहकार क्षेत्रात राजू शेट्टी यांचे मोठे योगदान आहे. त्या आधारावर राज्यपालांकडे सादर केलेल्या १२ जणांच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये त्यांचे नाव दिलेले आहे. त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. राज्यपाल याबाबत अंतिम भूमिका घेतील. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी भेट घेऊन विधान परिषदेवर सदस्यांची नियुक्ती करावी अशी विनंती केली आहे. परंतु मला आश्चर्य वाटते आहे की, राज्यपालांकडून इतका विलंब का केला जात आहे. त्यांच्या भूमिकेकडे आमचे लक्ष आहे. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केले आहे. राजू शेट्टी यांनी काय वक्तव्य करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यावर मला भाष्य करायचे नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ईडीचा गैरवापर देशभरात : माजी गृहमंत्री अनिल देशमुख, एकनाथ खडसे, अनिल परब यांच्या मागे ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. यासंदर्भात पवार यांना विचारले असता, ईडी आणि अन्य तपास यंत्रणा यापूर्वी देशात अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने कधीही वापरली गेली नव्हती. हल्लीचे सरकार या स्वायत्त यंत्रणा विरोधकांना नमवण्यासाठी वापरत आहे. हा गैरवापर केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये केला जात आहे असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

आघाडीसोबत जाऊन ‘काशी’ झाली म्हणून राजू शेट्टींनी काशीला जाऊन अंघोळ करावी नांदेड | राज्यात एका बाजूला अतिवृष्टी, महापुराने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. एफआरपी उसाचा मिळाला नाही. दुधाला भाव मिळाला नाही. महाविकास आघाडी सरकाडून अजून राजू शेट्टींचा भ्रमनिरास कसा काय झाला नाही? त्या वेळी सदाभाऊ खोत मंंत्री असल्यामुळे लगेच भ्रमनिरास झाला होता. आता भ्रमनिरास झाला असेल तर आत्मक्लेश यात्रा दुसऱ्यांदा काशीपर्यंत काढावी, जेणेकरून महाविकास आघाडीकडे जाऊन माझी काशी झाली म्हणून मी आता काशीला अंघोळ करण्यास आलो असे सांगावे, असा सल्ला रयत क्रांतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला.

आमदारकीचा मुद्दा गौण, शरद पवारांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बोलावे : राजू शेट्टी
आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. तो साधा समझोता आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. तो पाळायचा की नाही पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचा आणि कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचं आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो. आमदार व्हायचं की नाही हा मुद्दा महत्त्वाचा नाही. पूरग्रस्तांना मदत होणार की नाही यावर शरद पवारांनी बोलावं,अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी पवारांच्या वक्तव्यानंतर दिली.

तारतम्य ठेवण्याची गरज; अण्णा हजारेंना टोला : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंदिरे उघडण्याची मागणी केली आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारने राज्य सरकारला काही नियमावली दिली आहे. आणखी काही दिवस खबरदारी घ्यायची गरज आहे, असे निर्देश आहेत. मुख्यमंत्री ती काळजी घेत आहेत. अन्य घटकांचे काही दुसरे मत असेल तर लोकशाही आहे. केंद्र सरकारच्या विचारांचे लोक आहेत त्यांनी तारतम्य ठेवण्याची गरज आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला.

राज्यपालांचा आक्षेप : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी राज्यपालांनी राजू शेट्टींच्या नावावर आक्षेप घेतल्याचे सांगितले जाते. अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराची लगेच वरिष्ठ सभागृहासाठी शिफारस करता येत नाही, असे राज्यपालांनी म्हटले आहे. राज्यपालांचा आक्षेप तपासून पाहत आहोत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यामुळे राजू शेट्टींची आमदारकी हुकणार असल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...