आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरीचे सुख नाही त्रिभुवनी’ ही उक्ती सार्थ करण्याच्या ओढीने अलंकापुरीत दाखल झालेल्या लक्षावधी वारकऱ्यांच्या एकलयीत पडणाऱ्या पाऊलांच्या साथीने, माऊली माऊली अशा जयजयकाराने मंगळवारी इंद्रायणीचे काठ दुमदुमले. भागवत धर्माची ध्वजा खांद्यावर पेलत, मुखी माऊलींच्या ओव्या घोळवत वारकरी माऊलींच्या पादुकांच्या दर्शनात रमले आणि सायंकाळी माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थानाला निघाला.
तत्पूर्वी समाधी मंदिरात पहाटेपासून धार्मिक विधींना सुरवात झाली. घंटानाद, काकडआरतीनंतर भाविकांच्या महापूजांना प्रारंभ झाली. त्यानंतर दर्शनबारी खुली करण्यात आली. महाप्रसादानंतर दर्शनबारी सुरू ठेवण्यात आली. सायंकाळी सहाच्या सुमारास माऊलींच्या पालखी सोहळ्याने पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. परंपरेनुसार, पहिला मुक्काम आळंदी येथील आजोळघरी असून, २२ जून रोजी माऊलींचा पालखी सोहळा तुकोबांच्या पालखी सोहळ्यासमवेत पुण्यनगरीत दोन दिवसांच्या मुक्कामासाठी येणार आहे.
प्रस्थानासाठी माऊलींचे मानाचे अश्व मंदिरात आले. हैबतबाबांच्या वतीने आरती झाली. त्यानंतर आळंदी देवस्थानच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरती झाली. माऊलींच्या चांदीच्या पादुका वीणा मंडपात ठेवलेल्या पालखीमध्ये प्रतिष्ठापित करण्यात आल्या. त्यानंतर मानाची वस्त्रे, पागोटी व श्रीफळाचा प्रसाद वाटण्यात आला. आळंदीचे समाधी मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पालखीसोहळा प्रमुख विकास ढगे पाटील हे सोहळ्यावर देखरेख करत होते.
पालख्यांच्या स्वागतासाठी पुणे सज्ज
बुधवारी (२२ जून) सायंकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज, या दोन्ही पालख्या पुण्यनगरीत दोन दिवसांच्या मुक्कामासाठी येणार आहेत. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात माऊलींचा पालखी सोहळा विसावतो, तर नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात तुकोबांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. दोन्ही मंदिरांच्या व्यवस्थापनाने पालख्यांच्या सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. दोन वर्षांनंतर पालखी मुक्कामी येणार असल्याने वेगळा उत्साह असल्याची भावना गोरखनाथ भिकुले (भवानी पेठ मंदिर) आणि आनंद पाध्ये (निवडुंग्या विठोबा मंदिर) या व्यवस्थापकांनी व्यक्त केली. दोन्ही मंदिरांची साफसफाईस रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, सजावट पूर्ण झाली आहे. उत्सव मंडपही उभारण्यात आला आहे. दोन्ही पालख्या विश्रांती घेऊन शुक्रवारी सकाळी पंढरीच्या वाटेने मार्गस्थ होतील, असे ते म्हणाले.
तुकोबांची पालखी आकुर्डीत
श्रीक्षेत्र देहू येथून तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी सकाळी आकुर्डीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. सायंकाळी पालखी सोहळ्याचे स्वागत आकुर्डी विठ्ठल रखुमाई मंदिराच्या वतीने करण्यात आले. मनपाच्या वतीने भक्तीशक्ती चौक येथे पालखीचे स्वागत झाले. पिंपरी चिंचवडकरांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. बुधवारी सकाळी तुकोबांचा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेने वाटचाल करेल आणि सायंकाळी दोन्ही पालख्या एकत्रितपणे पुण्यात मुक्कामासाठी येतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.