आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाहित्य महामंडळाचे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा लातूरमधील उदगीर तालुक्यात होणार आहे. या संमेलनस्थळाचे औचित्य अधोरेखित करणारी आणि संग्राह्य मूल्य असणारी ‘अश्मक’ या शीर्षकाची स्मरणिका यंदा साहित्य रसिकांच्या भेटीला येणार आहे. उदगीर येथील महाविद्यालयातील मराठी विषयाचे ज्येष्ठ अध्यापक दीपक चिद्दरवार यांनी ‘अश्मक’च्या संपादनाची जबाबदारी पेलली आहे. ‘सुमारे २५० पृष्ठसंख्येची ही स्मरणिका साहित्यप्रेमींना उदगीरसह या परिसराच्या प्राचीन वारशाची,
वैचारिक-सांस्कृतिक-कलात्मक-सामाजिक परंपरेचा उत्तम परिचय करून देणारी ठरेल,’ असा विश्वास दीपक चिद्दरवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.
स्मरणिकेच्या शीर्षकापासूनच आम्ही वेगळेपण जपले आहे. ‘अश्मक’ हे नाव प्राचीन काळातील १६ महाजनपदांपैकी एक नाव आहे. उदगीर आणि आसपासचा विस्तीर्ण प्रदेश, पूर्वी ‘अश्मक’ हे महाजनपद म्हणून परिचित होता. या प्रदेशाचा उल्लेख इस पूर्व सहाव्या शतकापासून आढळतो. गोदावरीच्या दक्षिणेकडील मराठवाड्याचे नांदेड, बीड, उस्मानाबाद आणि लातूर हे चार जिल्हे, कर्नाटकातील बीदर व गुलबर्गा हे भाग तसेच तेलंगणातील सीमावर्ती भाग मिळून पूर्वीचा ‘अश्मक’ प्रदेश ओळखला जात होता. येथे मराठीसह कन्नड व तेलुगू भाषिक लोक राहतात. या प्रदेशाने सातवाहन, बादमीचे चालुक्य, राष्ट्रकूट, वाकाटक, यादवांसह बहमनी आदी राजवटी अनुभवल्या. सत्ताकेंद्राच्या सतत नजिक असणारा हा प्रदेश कसा होता, येथील सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला व शैक्षणिक परंपरा कशा होत्या, यांचे यथार्थ दर्शन ‘अश्मक’ या स्मरणिकेत घडेल, असे प्रा. चिद्दरवार यांनी सांगितले.
मान्यवरांच्या लेखाने समृद्ध बनणार स्मरणिका
स्मरणिकेचे तीन प्रमुख भाग असतील. पहिला भाग उदगीरचा वारसा या नावाने असेल. त्यामध्ये १२ लेखांचा समावेश आहे. दुसरा भाग साहित्याच्या सहवासात अशा स्वरूपाचा असून यामध्ये मान्यवर लेखकांनी लेखन केले आहे. त्यामध्ये दत्ता भगत, अरुण प्रभुणे, दत्तप्रसाद दाभोळकर, अरुणा ढेरे, अतुल देऊळगावकर, रवींद्र ठाकूर, केशव देशमुख, विजय पाडळकर, आसाराम लोमटे, दासू वैद्य आदींनी लेखन केले आहे. तिसरा भाग साहित्यवेध असा असून, दिवंगत सुधाकर देशमुख, डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. रणधीर शिंदे, दीपक पवार, डाॅ. सुधीर गव्हाणे आदींचे लेख समाविष्ट आहेत.
मुखपृष्ठावर वैशिष्ट्यपूर्ण पेंटिंग
अश्मक या स्मरणिकेसाठी हिंगोली येथील प्रसिद्ध चित्रकार व कवी भ. मा. परसवाळे यांनी आगळेवेगळे पेंटिंग रेखाटली आहे. ते पेंटिंग आयोजक समितीने व संपादकीय मंडळाने स्मरणिकेच्या मुखपृष्ठासाठी निवडले आहे. उदगीरचा साहित्य-सांस्कृती व कलात्मक वारसा या पेंटिंगच्या माध्यमातून दर्शवला जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.