आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब थोरातांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार:अशोक चव्हाण म्हणतात- तरीही आम्ही पटोलेंसोबत; नानांचा दावा -घरातील वाद घरातच मिटवू

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी वरिष्ठांकडे पत्र दिले असले तरी आम्ही सध्या सर्वजण नाना पटोले यांच्या सोबत आहेत, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे बाळासाहेब थोरातांनी नाना पटोलेंविरोधात पक्षश्रेष्ठींकडे पत्र दिले, या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. नाना पटोलेंसोबत काम करणे आता अशक्य आहे, असे पत्रात बाळासाहेब थोरात यांनी म्हटल्याचे समोर येत आहे.

कसबा गणपतीचे घेतले दर्शन

कसबा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेसतर्फे आज रॅली काढण्यात आली. रॅलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे, शिवसेनेचे गजानन थरकुडे उपस्थित होते. पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर येथे दर्शन घेऊन रॅली काढण्यात आली. त्यावेळी अशोक चव्हाण बोलत होते.

रॅलीत सहभागी झालेले काँग्रेस नेते.
रॅलीत सहभागी झालेले काँग्रेस नेते.

आम्ही सर्वजण नाना पटोलेंसोबत

अशोक चव्हाण म्हणाले, नाना पटोलेंविरोधात बाळासाहेब थोरातांनी वरिष्ठांकडे पत्र दिले असले तरी आम्ही सर्वजण नाना पटोलेंसोबत आहोत. महाविकास आघाडी एकत्रित असून नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आमचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. कसबा आणि चिंचवड येथील जागा बिनविरोध करण्याची भाषा भाजप करते आहे. मात्र, देगलूर, कोल्हापूर मध्ये अशाप्रकारे परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस त्यांनी कोणती भूमिका घेतली हे सर्वांनी पाहिले. त्यामुळे सोयीनुसार भाजप वागत असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.

घरातलं भांडण घरातच सोडवू- पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे आमचे नेते आहेत. घरातलं भांडण घरात सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. वरिष्ठ नेत्यांबरोबर काय बोलणं झालं हे जाहीर सांगायचं नसते. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महविकास आघाडीचे दोन्हीही उमेदवार विजय होतील. माजी खासदार रजनी सातवांच्या वेळेस मी देवेंद्र फडणवीस यांना बिनविरोध निवडणूक करण्यासाठी भेटायला गेलो होतो. परंतु त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. भाजप फक्त विविध प्रसारमाध्यमातून चर्चा करत आहे. प्रत्यक्ष कोणीही आमच्याशी दोन जागा बिनविरोध करण्याबाबत चर्चा केली नाही. त्यामुळे या जागा बिनविरोध होणं कठीण आहे.

...तर माघार घेईल- रवींद्र धंगेकर

तर, कसबा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले, कसबा विधानसभा मतदारसंघात मला तिकीट जाहीर झाल्याबद्दल मी महाविकास आघाडीतील नेत्यांचे आभार मानतो. इतके वर्ष तिन्ही पक्ष वेगवेगळ्या मार्गाने निवडणूक लढत असल्याने त्याचा फायदा भाजपला होत होता. मात्र, यंदा प्रथमच तिन्ही पक्ष एकत्रित आल्याने महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल. माझ्या नेत्यांनी मला या निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितल्यास मी निवडणूक बिनविरोध करण्यास तयार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास बागवे ,टिळक गैरहजर

भाजपमध्ये हेमंत रासने यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाला टिळक गैरहजर राहिले. त्याच सोबत खासदार गिरीश बापटदेखील गैरहजर राहिल्याने नाराजीची चर्चा रंगली आहे. काँग्रेसमध्येही असाच प्रकार घडला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा अर्ज भरण्याकरता काँग्रेसचे नेते रोहित टिळक, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे, त्यांचे पुत्र नगरसेवक अविनाश बागवे, शिवसेना नेते संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील ठोंबरे गैरहजर राहिल्याने दोन्ही पक्षातील नाराजीची चर्चा चांगलीच रंगली आहे.

संबंधीत वृत्त

संजय राऊतांनी घेतली बाळासाहेब थोरातांची बाजू:म्हणाले- नेत्याच्या आजाराचा गैरफायदा घेऊन कटकारस्थान करणे किळसवाणे

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे पत्र लिहून नाना पटोलेंसोबत काम करणे अशक्य आहे, असे म्हटल्याचे समोर येत आहे. यावर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात यांची बाजू घेत नाना पटोलेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...