आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी काळात शिक्षण आणि स्वास्थ्य या दोन विषयांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये खासगी शिक्षणसंस्था सुद्धा अग्रेसर आहेत, असे मत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी व्यक्त केले.
भारती विद्यापीठाच्या ५९ व्या वर्धापनदिन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन अशोक गेहलोत यांच्या हस्ते आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऑडिटोरियमचे उद्घाटन महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरु डॉ. विवेक सावजी, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम्. एस्. सगरे, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते.
गेहलोत म्हणाले, 25 वर्षांपूर्वी मी जेव्हा राजस्थानचा मुख्यमंत्री झालो तेव्हा महाराष्ट्र, पुणे, कर्नाटक मध्ये खासगी शिक्षण संस्थांचे काम पाहिले. त्यांचेच अनुकरण करून त्याची राजस्थान मध्ये सुरुवात केली. आज राजस्थानने शिक्षणात आघाडी घेतलेली आहे. इंग्रजीचे धडे देणाऱ्या नवीन दोन हजार शाळा आणि 302 नवीन महाविद्यालये सुरु केली आहेत. 500 हुशार विद्यार्थ्यांना राज्यशासनातर्फे परदेशी शिक्षणासाठी पाठवले जात आहे. याशिवाय आरोग्यावरही लक्ष केंद्रित केले असून मोफत उपचार आणि मोफत औषधे मिळतील असा प्रयत्न करीत आहोत. आगामी काळात सामाजिक सुरक्षा हक्काचाही विचार होणे गरजेचे आहे.
नार्वेकर म्हणाले, वाचायला शिकवतो तो देश घडवतो. आज स्किल्ड कॅपिटल ही भारताची नवी ओळख आहे. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि तरुणांचा देश बनतो आहे. सामान्यातील सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या भारती विद्यापीठासारख्या शिक्षण संस्थांचा यात सर्वात मोठा वाटा आहे.
डॉ विश्वजीत कदम म्हणाले , जनसामान्यांचे विद्यापीठ अशी भारती विद्यापीठाची ओळख आहे याचे कारण शिक्षणाबरोबरच समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्राच्या उन्नतीतही या विद्यापीठाने महत्वाची भूमिका बजावलेली आहे.
चौकट
विधानसभा अध्यक्षांची कौतुकाची थाप
लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विश्वजीत कदम हे नेहमीच महत्त्वाच्या प्रश्नांवर विधानसभेत अभ्यासपूर्ण बोलतात. योग्य आणि मुद्देसूद अशी मांडणी करतात. त्यांच्या भाषणाप्रमाणेच ते त्यांच्या कार्यक्षेत्रातही उत्तम काम करत आहेत, अशा शब्दात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विश्वजीत कदम यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.