आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर:राज्यातील प्रत्येक पोलिस शिपाई आता निवृत्तीच्या वेळी होणार PSI; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची मोठी घोषणा, लवकरच निर्णय

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील पोलिस शिपाई आणि कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने सुखद घोषणा करण्यात आली आहे. आता राज्यभरातील पोलिस शिपाई आपल्या निवृत्तीपर्यंत पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदापर्यंत मजल मारतील. पोलिस दलात शिपाई या पदावर रुजू होणाऱ्या प्रत्येकाची आता पोलिस उप-निरीक्षक पदावर निवृत्ती होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात यासंदर्भातील घोषणा केली आहे.

पोलिस दलात शिपाई या पदावर रुजू होणाऱ्या प्रत्येकाची पोलिस उप-निरीक्षक होण्यासाठी धडपड सुरू असते. कठोर मेहनत आणि ड्युटीचे तास यांचे नियोजन लावून काही परीक्षा देऊन पीएसआय होतात. तर काही विशेष कामगिरी आणि कर्तृत्वाने पदोन्नती मिळवतातही. पण, बहुतांश शिपायांना निवृत्तीच्या वेळी केवळ सहाय्यक पोलिस उप-निरीक्षक (ASI) पदावर निवृत्त व्हावे लागते. काही पोलिस कर्मचारी तर त्यापूर्वीच निवृत्त होतात. त्याचीच दखल आता गृहमंत्र्यांनी घेतली आहे.

निवृत्तीपूर्वी 5 वर्षे अधिकारी म्हणून काम करण्याची संधी
दिलीप वळसे पाटील म्हणाले, पोलिस दलात 3 दशक सेवा दिल्यानंतरही शिपायांना केवळ ASI पदावर येऊन निवृत्ती मिळते. पोलिस शिपाई म्हणून रुजू झालेल्या प्रत्येकाला PSI पदावर पोहोचता यावे आणि निवृत्तीच्या 5 वर्षांपूर्वीपर्यंत या अधिकारी पदावर काम करता यावे अशी योजना आहे. याच दरम्यान, कोरानो काळात पोलिसांनी रस्त्यावर उतरून, आपले जीव धोक्यात टाकून जी कामगिरी केली त्याबद्दल गृहमंत्र्यांनी पोलिसांचे तोंडभर कौतुक केले. याबाबत अधिकृत निर्णय घेण्यासाठी एक बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीसाठी वेळ द्यावा अशी मागणी गृहमंत्र्यांनी कार्यक्रमातच केली. त्याला अजित पवारांनी देखील होकार दिला.

लवकरच होणार अधिकृत निर्णय
राज्यातील प्रत्येक शिपाई पीएसआय पदावर निवृत्त होणार असा एक प्रस्ताव गृहमंत्र्यांनी राज्य सरकारला पाठवणार आहेत. यामुळे राज्य सरकारवर फारसा आर्थिक भारही पडणार नाही. या प्रस्तावाबाबत एकत्र बसून निश्चीत चर्चा केली जाईल असे कार्यक्रमात उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. पुण्यातील ग्रामीण पोलिसांच्या वतीने उभारण्यात आलेल्या एका पेट्रोल पंपाचे उद्घाटन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात ते बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...