आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:आता कोरोना रुग्णांचे ट्रेसिंग गतीने करण्याचा प्रयत्न, लढाई उद्योगनगरीत आता थ्री टी अभियानाला सुरुवात

पुणे ( जयश्री बोकील )10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माॅर्बिड रुग्णांची काळजी घेणे आवश्यक

राज्यात मुंबईपाठोपाठ कोरोना संसर्ग आणि रुग्णांचे प्रमाण पुणे विभागात अधिक आहे. विशेषत: पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यात कोरोनाग्रस्त रुग्ण शोधणे, त्यांचा पाठपुरावा करणे आणि योग्य ते उपचार मिळवून देणे (ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट असे थ्री टी) ही प्रक्रिया मंद गतीने होत असल्याची टीका झाल्यावर प्रशासनाने ‘थ्री टी अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाद्वारे कोरोना संशयितांचा शोध घेणे, टेस्टिंगचा वेग वाढवणे, लक्षणे आढळलेल्यांचा सातत्याने पाठपुरावा करणे आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्वरित उपचार सुरू करणे शक्य होणार आहे.

मार्च आणि एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या अगदीच मर्यादित होती. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच, कोरोना संसर्गात लक्षणीय वाढ होत गेली. त्यातच प्रशासकीय पातळीवर कोरोनासंबंधित रुग्णांचे ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंटच्या बाबतीत कासवगती असल्यामुळे तो टीकेचा विषय झाला. विविध रुग्णांच्या तपासणी अहवालांतून एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आली, ती म्हणजे बहुसंख्य रुग्णांना कोरोना संसर्ग होण्याआधीपासून मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंड विकार, हृदयविकार आदी समस्या होत्या. किंबहुना असे जुनाट रोग असणाऱ्यांना कोरोना संसर्ग जलद गतीने होण्याची शक्यता असते, हेही स्पष्ट झाले. अशा रुग्णांना कोमॉर्बिड अशी संज्ञा आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात अशा कोमॉर्बिड रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता शहरात ज्या व्यक्तींना काही काळापासून मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडविकार, हृदयविकाराचा त्रास आहे, अशा व्यक्तींकडे विशेष लक्ष पुरवणे, हा या अभियानाचा उद्देश आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. आधीपासून हे रोग असणाऱ्या व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका इतरांपेक्षा अधिक असतो, त्यांची प्रकृती लवकर धोकादायक बनू शकते. त्यामुळे अशा कोमॉर्बिड रुग्णांचा शोध, पाठपुरावा आणि उपचार लवकरात लवकर सुरू करणे, या दृष्टीने अभियानाची आखणी करण्यात येत आहे, असेही हर्डीकर म्हणाले.

‘कोमॉर्बिड रुग्णांचा शोध याआधी फक्त प्रतिबंधित क्षेत्रात (रेड झोन) घेतला जात होता. या अभियानातून असा शोध सर्व ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी डाटा कलेक्शनचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

माॅर्बिड रुग्णांची काळजी घेणे आवश्यक
कोरोनाविषयीची भीती आणि सामाजिक दडपणापोटी कित्येक जण सुरुवातीची लक्षणेही दडवून ठेवतात. त्यामुळे उपचारास विलंब होतो आणि रुग्ण कमी काळात गंभीर अवस्थेत जातो. काही वेळा असे रुग्ण दाखल केल्यानंतर काही तासांतच दगावताना आढळले आहेत, किंवा एक ते दोन दिवसांत त्यांचा मृत्यू होतो, असेही घडले आहे. विशेषत: कोमॉर्बिड रुग्णांच्या बाबतीत थोडाही विलंब झाल्यास धोका वाढतो. त्यामुळे समाजात कोमॉर्बिड रुग्णांची विशेष काळजी घेणे आवश्यक बनले आहे. या अभियानातून असे रुग्ण गतीने शोधणे शक्य होईल, असे वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...