आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील वाहन निर्मिती उद्योगाने जागतिक पातळीवरील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रदूषणमुक्त इंधन प्रणाली आत्मसात केल्यास हा उद्योग देशातील पहिल्या क्रमांकाचा उद्योग बनेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात व्यक्त केला.
कमर्शियल व्हेईकल फोरम तर्फे आयोजित वाहन उद्योगाशी संबंधित एक दिवसाच्या परिषदेत समारोप प्रसंगी ते बोलत होते. देशभरातील प्रमुख वाहन निर्मिती उद्योगाचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, केंद्र सरकारला वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा त्याचबरोबर सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा वाहन निर्मिती हा उद्योग आहे. देशात तयार होणाऱ्या मोठ्या व्यावसायिक वाहनांपैकी 50 टक्के वाहनांची निर्यात होते. वाहन निर्मिती क्षेत्रात भारत चवथ्या स्थानावर पोचला असून आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत या उद्योगाचा वाटा फार मोलाचा ठरला.जुनी वाहने भंगारात काढण्याचा धोरणाचा सकारात्मक परिणाम या उद्योगावर झाल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, आज देशात नोंदणीकृत सुमारे 35 कोटी वाहने आहेत. दररोज त्यात भर पडत असून परिणामी इंधन आयातीवरील खर्च वाढत आहे, प्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. ते रोखण्यासाठी या उद्योगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतानाच इथेनॉल, मिथेनोल, जैव इंधन, हायड्रोजन आणि विजेसारख्या प्रदूषणमुक्त इंधन प्रणालीचा उपयोग होईल अशी वाहने तयार केली पाहिजेत. त्यादृष्टीने भारतात खूप चांगले संशोधन देखील सुरू आहे. देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा लवकरच विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टीने धोरण आखले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कृषी मालाच्या कचऱ्यापासून जैविक इंधन बनवण्याचे उद्योग आज देशात उभे राहत आहेत शिवाय फ्लेक्स इंजिन निर्मितीच्या क्षेत्रात देखील भारताने चांगली प्रगती केली आहे मात्र त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर हा उद्योग लवकरच देशातील पहिल्या क्रमांकाचा उद्योग बनेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारकडून या उद्योगाला हवे असलेले सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.