आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा बुधवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या आळंदी रोड येथील कार्यालयाच्या मैदानावर उभारलेल्या २५० मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅक आणि हलक्या वाहनांसाठीच्या 'रोलर ब्रेक टेस्टर'चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
काय केल्या घोषणा?
परब म्हणाले, कोरोना कालावधीमध्ये रिक्षाचालकांना अडचणींना सामोरे जावे लागले. याची शासनाला जाणीव असून त्या काळात रिक्षाचालकांची नोंदणी करून काही प्रमाणात मदतही करण्यात आली. त्यामुळे आता रिक्षाचालकांची संख्या शासनाकडे उपलब्ध असून रिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येईल. त्यामाध्यमातून रिक्षाचालकांची मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच, लोकांचा परिवहन कार्यालयामध्ये येण्याचा त्रास कमी व्हावा यासाठी परिवहन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या १२० सेवांपैकी ८० सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. उर्वरित सेवाही ऑनलाइन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
परवान्यांची संख्या मर्यादित ठेवू
परब म्हणाले, पुणे शहरात ३ लाख ५० हजार वाहनांना फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यक आहे. त्यामध्ये ८० हजार रिक्षा आणि १ लाख २० हजार हलक्या वाहनांचा समावेश आहे. आळंदी येथे झालेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकमुळे त्यांचा ३० किलोमीटर लांब दिवेघाटात जाण्याचा त्रास, पूर्ण दिवसाचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. शहरामध्ये रिक्षा परवान्यांची संख्या वाढली असून ती मर्यादित ठेवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचे प्रयत्न
अजित पवार म्हणाले, मेट्रोवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असून तो आवश्यक असला तरी राज्य परिवहन महामंडळाच्या ३ हजार बसचे नियोजन राज्याच्या अर्थसंकल्पात केले आहे. सर्व बस ईलेक्ट्रिक करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात जागेची अडचण असतानाही काटकोनात हा ब्रेक टेस्ट ट्रक बसवल्यामुळे वाहनमालकांची चांगली व्यवस्था झाली आहे. पुण्याची वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाचा आराखडा बनवत असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.